वडगाव-पैसा फंड रस्त्यावर खड्डेच खड्डे
By Admin | Updated: June 18, 2015 23:39 IST2015-06-18T23:39:42+5:302015-06-18T23:39:42+5:30
वडगाव-पैसाफंड रस्त्यावर अगणित खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता वाहून गेला असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

वडगाव-पैसा फंड रस्त्यावर खड्डेच खड्डे
वडगाव मावळ : वडगाव-पैसाफंड रस्त्यावर अगणित खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता वाहून गेला असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरुन चालताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी घसरून विद्यार्थी, कामगार व नागरिकांचे अपघात होत आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
हा रस्ता विकास प्रकल्प क्षेत्रात असून, वडगाव व तळेगाव दाभाडे या शहराला जोडणारा जवळचा आहे. या रस्त्यालगत मंगल कार्यालय, शाळा, गृहप्रकल्प व औद्योगिक कारखाने असल्याने रस्त्यावरून विद्यार्थी, कामगार व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. रस्त्याचे खड्डे पडून रस्त्याच्या बाजूला खडीचे ढिगारे साचले असून वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या रस्त्यावरुन दुचाकी व चारचाकी वाहने जाताना टायरखालून दगड उडून पादचाऱ्यांना लागल्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावर अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची दुरवस्था वाढत आहे. विशाल लॉन्सजवळच्या ओढ्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्याने तेथे रस्ता धोकादायक झाला आहे. रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी लग्न समारंभाच्या वेळी वाहतूककोंडी होते.
रस्त्यावरील वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा नाल्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहते . त्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येते. चालताना नागरिक पाय घसरून पडत आहेत. शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घसरुन पडल्याने दुखापती होत आहेत. माऊंट सेंट शाळेजवळ रस्त्यालगत अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला असल्याने एकावेळी दोन वाहनांची ये-जा होत नाही. या रस्त्याच्या एका बाजूला खड्डा असल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. रस्त्यातील अतिक्रमण हटवून दुतर्फा नाला करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस अतुल वायकर, विशाल वहिले, प्रकाश वहिले, रोहिदास म्हाळसकर, गणेश गवारी, प्रमोद वहिले व नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)