बटाटा व कांद्याची आवक वाढून भावात घट
By Admin | Updated: January 23, 2017 02:24 IST2017-01-23T02:24:10+5:302017-01-23T02:24:10+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घट झाली आहे.

बटाटा व कांद्याची आवक वाढून भावात घट
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घट झाली आहे. ही आवक १९०० क्विंटलने वाढली आहे. बटाट्याची आवक १६०० क्विंटलने वाढली, तर भावात ५० रुपयांनी घसरण झाली आहे. येथील बाजारात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगा यांची काहीच आवक झाली नव्हती ती या आठवड्यात झाली. एकूण उलाढाल २ कोटी ८० लाख रुपये झाली असून ही उलाढाल ८५ लाखांनी वाढली.
कांद्याला या आठवड्यात ५०० ते ८०० रुपये असा प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात घट झाली आहे. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपयांवरून ८०० रुपयांवर स्थिरावला. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, शेळ्या-मेंढ्या यांच्या संख्येत वाढ होऊन किमती स्थिरावल्या. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक ७९०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १९०० क्विंटलने वाढूनही भावात १०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपयांवरून ८०० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक २२५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १६०० क्विंटलने वाढून भावात ५० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव ७५० रुपयांवरून ७०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची आवक या आठवड्यात झाली नाही. जळगाव व बंदूक शेंगांची आवक अनुक्रमे ५ क्विंटल झाली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात २ लाख ३५ हजार जुड्या मेथीची आवक झाली, तर २ लाख ८५ हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली. शेपू आवक १५ हजार जुड्या झाली. शेलपिंपळगाव आवारात मेथीची ७ हजार ५०० जुड्या, तर कोथिंबिरीची २० हजार ५०० जुड्या आणि शेपूची आवक झाली नाही. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ४३८ पोती झाली असून, मिरचीला १५० ते २५० रुपये असा भाव मिळाला.