‘गुणवत्ता कौशल्य’च्या निधीत घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:11+5:302021-02-05T05:16:11+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविल्या जाणाऱ्या क्वालिटी इंप्रुव्हमेंट प्रोग्राम (क्यूआयपी) योजनेअंतर्गत संलग्न महाविद्यालयांना विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध ...

Possibility of declining funding for ‘quality skills’ | ‘गुणवत्ता कौशल्य’च्या निधीत घट होण्याची शक्यता

‘गुणवत्ता कौशल्य’च्या निधीत घट होण्याची शक्यता

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविल्या जाणाऱ्या क्वालिटी इंप्रुव्हमेंट प्रोग्राम (क्यूआयपी) योजनेअंतर्गत संलग्न महाविद्यालयांना विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, यंदा विद्यापीठाच्या ठेवी निम्म्याने कमी झाल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ‘क्यूआयपी’साठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी संलग्न महाविद्यालयांच्या विकासकामांना ब्रेक लागणार आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातर्फे क्यूआयपी योजना राबवली जात आहे. महाविद्यालयात सोलर प्रकल्प, स्वच्छतागृह, लेडिज कॉमन रूम कॅफेटेरिया बांधण्यासाठी क्यूआयपी अंतर्गत निधी देण्यात येतो. पुणे,अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांतील अनेक महाविद्यालयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक साधणे, उपकरणे, क्रीडा साहित्य खरेदी आदीसाठी सुध्दा या योजनेतून अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच या योजनेतून मिळणाऱ्या निधीतून महाविद्यालयांनी विविध विषयांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, चर्चासत्रांचे आयोजन केले आहे.

क्यूआयपी योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठातर्फे कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे काही निवडक महाविद्यालयांनाच या योजनेचा लाभ घेता आला. विद्यापीठाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षात क्यूईपी योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतुद केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे दोन वर्षांत या योजनेच्या निधीत तीन कोटींची कपात झाली. आता विद्यापीठाच्या ठेवींमध्ये घट झाल्याने या योजनेच्या निधीमध्ये आणखी कपात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

-------------------------------------------

Web Title: Possibility of declining funding for ‘quality skills’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.