विज्ञान क्षेत्रात ग्रामीण भागातून विद्यार्थी घडण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन : डॉ.सोळंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:11+5:302021-01-08T04:32:11+5:30

खोडद : ‘जीएमआरटी प्रकल्पाच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आयईईई माइल स्टोन हे ...

Positive attitude towards students from rural areas in the field of science: Dr. Solanki | विज्ञान क्षेत्रात ग्रामीण भागातून विद्यार्थी घडण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन : डॉ.सोळंकी

विज्ञान क्षेत्रात ग्रामीण भागातून विद्यार्थी घडण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन : डॉ.सोळंकी

खोडद : ‘जीएमआरटी प्रकल्पाच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आयईईई माइल स्टोन हे मानांकन देऊन करण्यात आलेला गौरव होय. हा प्रकल्प लोकाभिमुख व्हावा व विज्ञान क्षेत्रात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घडावेत यासाठी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे,’ असे प्रतिपादन एन.सी.आर.ए.चे वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी केले.

जगातील सर्वात मोठी असलेली खोडद येथील रेडिओ दुर्बीण जीएमआरटी प्रकल्पाला आयईईई माइल स्टोन हे भारतातील तिसरे मानांकन प्राप्त झाल्याबद्दल जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे वतीने एन.सी.आर.ए.चे वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी, जी.एम.आर.टी. प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. रतिलाल बाबेल, सचिव तानाजी वामन, सहसचिव दिलीप लोंढे, जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, पुंडे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सोळंकी म्हणाले, ‘जीएमआरटी’ हा अविरत चालणारा प्रकल्प आहे. यात नवीन, शाश्वत, समाजोपयोगी तंत्रज्ञान वापरलेले आहे. या प्रकल्पाची जगाने दखल घेतली. जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने आमचा होणारा हा सन्मान आमच्यासाठी तितकाच अनमोल आहे. हा घरातील, परिवारातील सन्मान असल्यामुळे त्याचा आम्हाला अभिमान आहे. जीएमआरटीमधील सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघाचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. या सन्मानामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.

प्रास्ताविक जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. रतिलाल बाबेल यांनी केले. आभार सचिव तानाजी वामन यांनी मानले.

कोट

प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज असते. जीएमआरटी प्रकल्प हा अवघ्या जगासाठी पथदर्शी व मार्गदर्शन करणारा प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील हवामान, वातावरण व पर्यावरण शुद्ध राहिले आहे. जीएमआरटीला जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ, सर्व शिक्षक, शेतकरी, नागरिक व समाजाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या पुढील काळात देखील अशाच सहकार्याची मी अपेक्षा करतो.

- अभिजित जोंधळे प्रशासकीय अधिकारी, जीएमआरटी प्रकल्प, खोडद

फोटो : जीएमआरटी प्रकल्पाला आयईईई मानांकनप्राप्त झाल्याबद्दल जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे वतीने डॉ. जे. के. सोळंकी व अभिजित जोंधळे यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Positive attitude towards students from rural areas in the field of science: Dr. Solanki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.