लोकलमध्ये महिला प्रवाशांची कुचंबणा
By Admin | Updated: December 23, 2015 00:08 IST2015-12-23T00:08:22+5:302015-12-23T00:08:22+5:30
नोकरी व शिक्षणासाठी लोकलने शहराच्या आसपासच्या उपनगरामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून रेल्वेस्थानकांवर त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची चांगली व्यवस्था नसल्याचे

लोकलमध्ये महिला प्रवाशांची कुचंबणा
पुणे : नोकरी व शिक्षणासाठी लोकलने शहराच्या आसपासच्या उपनगरामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून रेल्वेस्थानकांवर त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची चांगली व्यवस्था नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहाणीत समोर आले आहे.
पुण्यातून रोज लोणावळा, मळवली, कार्ले, देहूरोड यांसारख्या ठिकाणी अनेक मुली व महिला प्रवास करतात. हा प्रवास १० ते २० मिनीटांपासून, दीड ते दोन तासांपर्यंत असतो. या दरम्यान महिलांना स्वच्छतागृहांची आवश्यकता भासते. लोकलचा प्रवास हा ३ तासांहून कमी कालावधीचा असल्याने लोकलमध्ये स्वच्छतागृहे नसतात, असे कारण प्रशासनाकडून दिले जाते. मात्र गर्भधारणा असलेली महिला किंवा मासिक पाळी चालू असेल तर अशावेळी स्वच्छतागृह आवश्यक असतेच. त्यामुळे प्रवास जरी कमी कालावधीचा असला तरीही लोकलमध्ये ही सुविधा असायला हवी, असे मत लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. यामध्येही केवळ स्वच्छतागृहांची सुविधा करून उपयोग नाही तर त्याची स्वच्छताही राखली जायला हवी, असेही या महिला म्हणाल्या.
अशाप्रकारे स्वच्छतागृहाच्या कमतरतेमुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचेही महिलांकडून समजले. लोकलच्या डब्यांबरोबरच रेल्वेस्थानकावरही स्वच्छतागृहांची व्यवस्था चांगली नाही. त्यामुळे तातडीच्या वेळी स्थानकावर उतरून जायचे ठरविल्यास कधी त्याला टाळे ठोकल्याचे दिसते, तर कधी ही स्वच्छतागृहे तुंबलेली असल्याने त्याचा वापर काय, पण आत जाणेही कठीण अशी परिस्थिती असते. त्यामुळे महिलांच्या आरोग्याबाबत रेल्वे प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. याबरोबरच सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांचा वापर करणे हा आपला अधिकार असतानाही काही स्थानकांवर मात्र स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी नागरिकांकडून शुल्क आकारले जात असल्याची खंतही व्यक्त केली.