रंगांची उधळण करीत धुळवडीत पुणेकर चिंब
By Admin | Updated: March 7, 2015 00:19 IST2015-03-07T00:19:46+5:302015-03-07T00:19:46+5:30
लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी धुळवडीचा आनंद लुटला. शहरामध्ये अनेक रंगांमध्ये रंगलेल्या तरुण-तरुणींचे जथे फिरताना दिसून येत होते.

रंगांची उधळण करीत धुळवडीत पुणेकर चिंब
पुणे : होळीच्या शुभेच्छा देत एकमेकांवर विविध रंगांची बरसात करीत, चित्रपटांतील गाण्यांवर ताल धरून नाचत, पाण्यामध्ये चिंब होत, सामिष भोजनाचा आस्वाद घेत शहरात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी धुळवडीचा आनंद लुटला. शहरामध्ये अनेक रंगांमध्ये रंगलेल्या तरुण-तरुणींचे जथे फिरताना दिसून येत होते.
विश्वचषकातील भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघाची लढत दुपारपासून सुरू होणार असल्याने सकाळी लवकरच रंग खेळण्यास सुरुवात झाली. लहान मुलांमध्ये रंग खेळण्याचा विशेष आनंद दिसून येत होता. गटागटाने एकत्र फिरून मित्र-मैत्रिणींना रंग लावला जात होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयातील मुले-मुली एकत्र येऊन धूलिवंदन साजरे केले.
उत्तरेकडच्या राज्यांमध्ये धूलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते, तिकडून पुण्यात शिकायला तसेच नोकरीच्या निमित्ताने आलेल्या तरुण-तरुणी, कुटुंबीय ठरवून एकत्र आले होते. गाण्यांच्या तालावर नृत्य करीत, एकमेकांना रंगांत भिजवून काढून मोठ्या उत्साहात धूलिवंदन साजरे करण्यात आले. अनेक रंगांत रंगल्यामुळे चेहरेही ओळखू येत नसलेल्या तरुण-तरुणी दुचाकींवरून गटागटाने रस्त्यांवरून फिरताना दिसून येत होते.
शासकीय कार्यालयांना सुट्टी असली तरी खासगी कार्यालये काही ठिकाणी सुरू होती. त्याठिकाणी सहकाऱ्यांना रंग लावून आनंद लुटण्यात आला. रंग लावण्यावरून काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार घडल्याचे दिसून आले.
अनाथ, वंचित
मुलांचे ‘रंग बरसे’
पुण्यातील शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने वंचित, अनाथ मुलांसमवेत होळीचा सण साजरा करण्यात आला. अनाथ मुलांसमवेत होळी साजरी करण्याचे प्रतिष्ठानचे हे १८ वे वर्ष होते. रास्ता पेठेतील आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनाथ, अपंग, अंध, एचआयव्हीग्रस्त, मूकबधिर, देवदासींची मुले, फुगे विकणारी अशी ८०० मुले या उत्सवामध्ये सहभागी झाली होती. गाण्यांच्या तालावर नृत्य करीत त्यांनी धूलिवंदन साजरे केले. अपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, उपायुक्त एम. बी. तांबडे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भोई प्रतिंष्ठानचे मिलिंद भोई यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
ममता फाउंडेशन, येवलेवाडी तसेच जनसेवा फाउंडेशन कात्रज या संस्थेतील एड्सग्रस्त व अनाथ मुलांसमवेत अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल यांनी याचे आयोजन केले होते. या वेळी सागर आरोळे, संतोष पवार, धनंजय कांबळे, योगेश निकाळजे, विजय बिबवे उपस्थित होते.