तिसऱ्या सोमवारी भुलेश्वरी मिठाईची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:23+5:302021-08-24T04:15:23+5:30
भुलेश्वराचे मनमोहक रूप पाहून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. पहाटे चार वाजता शिवलिंगाला पुजारी व ग्रामस्थ यांच्यावतीने दही, दूध व ...

तिसऱ्या सोमवारी भुलेश्वरी मिठाईची पूजा
भुलेश्वराचे मनमोहक रूप पाहून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. पहाटे चार वाजता शिवलिंगाला पुजारी व ग्रामस्थ यांच्यावतीने दही, दूध व पंचामृतने आंघोळ घालण्यात आली. सकाळी सात वाजता शिवसेनेचे तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप आबा यादव यांनी महापूजा केली. मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. शिवलिंगाभोवती विविध प्रकारची मिठाईची पूजा करण्यात आली. महाकाय नंदी सजवण्यात आला. प्रदक्षिणा मार्गावरील विठ्ठल-रुक्मिणी यांना पोषाख चढवण्यात आला. भुलेश्वराची पालखी विविध फुलांनी सजवण्यात आली. पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. दुपारी बारा वाजता श्री भुलेश्वर यांची पालखी पाण्याच्या कुंडावरती पोहोचली. या वेळी पालखीसोबत मोजकेच मानकरी व पुजारी उपस्थित होते. कुंडापाशी देवास आंघोळ घालण्यात आली.
माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, उपसरपंच गोकुळ यादव, माजी सरपंच एकनाथ तात्या यादव यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. रीतीरिवाजानुसार दुपारी दीड वाजता महाद्वारावर प्रातिनिधिक स्वरूपात धार घालण्यात आली. भारतीय पुरातत्व विभाग, जेजुरी पोलीस स्टेशन, उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट, वीज विभाग, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी विशेष सहकार्य केले.
---
फोटो क्रमांक :२३ भुलेश्वर पालखी मिरवणूक
फोटो ओळी : मोजक्या मानकऱ्यांमध्ये काढण्यात आलेली भुलेश्वरी पालखी मिरवणूक.