पॉलिकॅब पाठोपाठ बनावट कुकर तयार करणाऱ्या दुकानावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:38+5:302021-02-21T04:20:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बनावट इलेक्ट्रिक वायरविरोधात उघडलेल्या माेहिमेनंतर पुणे पोलिसांनी आता हॉकिन्स कंपनीचा बनावट लोगो वापरुन कुकर ...

पॉलिकॅब पाठोपाठ बनावट कुकर तयार करणाऱ्या दुकानावर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट इलेक्ट्रिक वायरविरोधात उघडलेल्या माेहिमेनंतर पुणे पोलिसांनी आता हॉकिन्स कंपनीचा बनावट लोगो वापरुन कुकर तयार करणारी दुकान व गोडाऊनवर छापा घालून १७ लाख ४५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
याप्रकरणी दिलीप फुलचंद कोठारी (वय ५६, रा. मंगळवार पेठ) आणि विनोद तखतमल जैन (वय ६१, रा. शुक्रवार पेठ) यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवार पेठेतील कोठारी यांच्या दुकानात हॉकिन्स कंपनीचा लोगो वापरुन त्यावर मॅगीसन असे नाव लिहून तो लोगो प्रेशर कुकरवर चिकटवून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी पडताळणी करुन कोठारी यांच्या शुक्रवार पेठेतील दुकानात व शंखेश्वर युटेन्सिल ॲन्ड अप्लायन्सेस याच्या फुरसुंगी येथील गोडावूनमध्ये एकाचवेळी छापा घालण्यात आला. या ठिकाणी मॅगीसन प्रेशर कुकरचे बॉक्स विविध आकाराचे व क्षमतेचे १२८४ नग असा १७ लाख ४५ हजार ९५५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या ठिकाणी नवी माल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ५ हजार लोगो स्टीकर्स व हॉकिन्स कंपनीचे स्वामीत्व हक्क असलेले त्यावर मॅगीसन असे नाव असलेले १२६० कागदी रॅपर मिळाले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अण्णा माने , हणमंत कांबळे, मनिषा पुकाळे, नीलम शिंदे, संदीप कोळगे, संतोष भांडवलकर, प्रफुल्ल गायकवाड यांनी केली.