भीमा, मुळा-मुठा नदीला प्रदूषणाचा विळखा
By Admin | Updated: January 14, 2017 03:14 IST2017-01-14T03:14:40+5:302017-01-14T03:14:40+5:30
तालुक्यात भीमा आणि मुळा-मुठा नदीतील प्रदूषण वाढलेले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या नद्यांचे पात्र दुथडी भरुन वाहत होते.

भीमा, मुळा-मुठा नदीला प्रदूषणाचा विळखा
दौंड : तालुक्यात भीमा आणि मुळा-मुठा नदीतील प्रदूषण वाढलेले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या नद्यांचे पात्र दुथडी भरुन वाहत होते. मात्र वाळूमाफियांनी बेसुमार केलेल्या वाळूउपशामुळे नद्यांच्या पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी वाळूचे डोंगर साचलेले आहेत. पाण्यावर जलपर्णी साचली असून पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्र ऐरणीवर आला आहे.
तालुक्यात मुळा-मुठा आणि भीमा नदीचे साधारणत: अंदाजे ८० ते ८५ किलोमीटर अंतर आहे. नदीपात्रावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारलेले आहेत. मात्र, नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णी साचली असल्याने या नद्यांचे आणि जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही जलपर्णी कुजून असल्याने दुर्गंधी पसरली असून, डासांचाही उपद्रव वाढला आहे.पुणे आणि पिंपरी परिसरातील वाहून येणारे सांडपाणी यामुळे नदीपात्रातील पाणी दूषितझाले आहे.महिला धुणी भांडी करण्यासाठी नदीवर गेल्यानंतर नदीपात्रातील पाण्यामुळे हाताला पुरळ आणि खाज येणे असे प्रकार होतात. जनावरेही हे पाणी पिण्याचे टाळतात. वाळूमाफियांनी यांत्रिकी पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केल्याने यांत्रिकी बोटीतील आॅईल नदीपात्रात पसरुन तेलाचा तवंग पाण्यावर पसरला आहे. दुसरीकडे शहरी भागातील गटारीतील पाणीदेखील नदीपात्राला जाऊन मिळत आहे.
(वार्ताहर)