पोलिंग एजंटला चालेल फक्त प्रतिज्ञापत्र
By Admin | Updated: February 14, 2017 02:28 IST2017-02-14T02:28:15+5:302017-02-14T02:28:15+5:30
महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींसाठी पोलिसांनी केलेली चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती अखेर मागे

पोलिंग एजंटला चालेल फक्त प्रतिज्ञापत्र
पुणे : महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींसाठी पोलिसांनी केलेली चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती अखेर मागे घेतली आहे. त्यांनी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फक्त प्रतिज्ञापत्र दिले तरी चालणार आहे. त्यात त्यांनी स्वाक्षरीने माझ्यावर कुठेही, कोणताही गुन्हा दाखल नाही, असे लिहून द्यायचे आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
पोलिसांनी उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती केल्याची माहिती सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केली होती. एका प्रभागात किमान काही हजार मतमोजणी प्रतिनिधींना अवघ्या आठ दिवसांत हे प्रमाणपत्र पोलिसांकडून मिळवायचे होते. सर्व म्हणजे ४१ प्रभागांत मिळून ही संख्या काही हजारांपर्यंत होत होती. त्यासाठी या सर्वांना प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे मुद्रांक शुल्क लावून अर्ज द्यावा लागणार होता. असे प्रमाणपत्र देण्याची पोलिसांची पद्धत लक्षात घेता ते शक्य झाले नसते, यावर संबंधित वृत्तात प्रकाश टाकण्यात आला होता.
पोलिस दलात यावर चर्चा होऊन खरोखरच असे प्रमाणपत्र इतक्या कार्यकर्त्यांना फक्त ८ दिवसांत देणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा निर्णय बदलण्याचे ठरले. त्याप्रमाणे आता मतदान प्रतिनिधींनी त्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीचे एक प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे.