राजकारणाने गावाचा विकास खुंटला
By Admin | Updated: March 9, 2015 00:56 IST2015-03-09T00:56:04+5:302015-03-09T00:56:04+5:30
‘‘राज्याचे मुख्यमंत्री कोणी सोलापूरचे, कोणी साताऱ्याचे, तर कोणी बारामतीचे झाले, मात्र आजवर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झाला नाही.

राजकारणाने गावाचा विकास खुंटला
वाकड : ‘‘राज्याचे मुख्यमंत्री कोणी सोलापूरचे, कोणी साताऱ्याचे, तर कोणी बारामतीचे झाले, मात्र आजवर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झाला नाही. अन्यथा आजचे चित्र वेगळे असते. गावानुसार राजकीय आडाखे ठरतात. त्यामुळेच शेतकऱ्यांचा विकास झाला नाही. मात्र, येत्या काळात पारंपरिक सिंचन पद्धतीत निश्चितच आमूलाग्र बदल घडविणार आहे,’’ असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
सिंचन सहयोग आणि अभिनव फार्म्स क्लब, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेरे (ता. मुळशी) येथील आयोजित १६व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वेळी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, दि.बा. मोरे, जालिंदर जाधव, अभिनव क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, उपाध्यक्ष कैलास जाधव, मुळशीचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, नेरे गावचे सरपंच, हिंजवडीचे सरपंच श्यामराव हुलावळे, सुरेश हुलावळे, वंदे मातरम शेतकरी संघटनेचे जनार्दन पायगुडे यांच्यासह जलसंपदा व कृषी विभागातील अधिकारी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभानंतर प्रमोद मांडेकर (चांदे), स्वाती अरविंद शिंगाडे (सोनकसवाडी, बारामती), अंकुश पडवळे (मंगळवेढा) यांना प्रयोगशील पुरुष व महिला शेतकरी, तसेच उत्कृष्ट सिंचन सहयोग कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जयेश पाटील यांना एल. सी. कोकीळ विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोकुळ पाटील, किशोर मठपती, गिरीश डांगे, ज्ञानेश्वर शेंद्रे आदींना सिंचन कार्यासाठी प्रशस्तिपत्रक देण्यात आले. तर अभिनव क्लबचे उपाध्यक्ष कैलास जाधव यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘मी शेतकरी मी उद्योजक’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या सत्रात पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अनुभवकथन झाले. दुसऱ्या सत्रात सूक्ष्म सिंचनाचा शास्त्रीय पद्धतीने वापर या विषयावर कार्यशाळा, तर तिसऱ्या सत्रात पणन व अर्थव्यवस्था आदी विषयांवर विचारमंथन झाले. प्रशांत आडे आणि अशोक पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)