पक्षांतरामुळे राजकीय उलथापालथ
By Admin | Updated: September 27, 2014 07:25 IST2014-09-27T07:25:15+5:302014-09-27T07:25:15+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती फुटल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संधीतून आजचा दिवस पक्षांतरांचा ठरला

पक्षांतरामुळे राजकीय उलथापालथ
पुणे : कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती फुटल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संधीतून आजचा दिवस पक्षांतरांचा ठरला. इच्छुकांनी आपल्या पक्षातून संधी न मिळाल्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला.
जिल्हा बॅँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला. इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे आणि भाजप-रासप युतीचे जगदाळे यांच्याशी सामना करावा
लागणार आहे.
गेल्या वेळी जगदाळे यांनी अपक्ष म्हणून लढणाऱ्या भरणे यांना साथ दिली होती. या वेळीही महाआघाडीच्या माध्यमातून भरणे आणि जगदाळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, आघाडी तुटल्याने भरणे यांना थेट राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार आहे.
पुरंदर तालुक्यातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राहुल शेवाळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे शिवतारे यांच्या विरोधात शेवाळे लढू शकतील.
राष्ट्रवादीची उमेदवारी मात्र जाहीर झालेली नाही. राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन तावरे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तावरे यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. शिवसेनेकडून जुन्नरमधून आशाताई बुचके यांना उमेदवारी जाहीर झाल्याने इच्छुक असलेले माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांना भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. माजी जि.प. सदस्य प्रसन्न डोके, माजी नगराध्यक्ष जुन्नर सुनील मेहेर यांनी शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
खेडमध्ये परिवर्तन आघाडी स्थापण्यात पुढाकार घेणारे शरद बुट्टे पाटील हे युती फुटल्याचा निर्णय जाहीर होताच भाजपामध्ये गेले आहेत. शरद बुट्टे पाटील हे राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषदेचे सदस्य आणि कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापतीही होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केला आहे.
गेल्या वेळी त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, ऐनवेळी पुन्हा दिलीप मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिरूरमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मंगलदास बांदल हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
गेल्या वेळी बांदल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तर भाजपमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आणि पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्री पलांडे यांनीही शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
(वार्ताहर)