लग्नाच्या मांडवात राजकीय राडा
By Admin | Updated: February 9, 2017 03:16 IST2017-02-09T03:16:16+5:302017-02-09T03:16:16+5:30
राजकीय पदाधिकाऱ्याच्या लग्नात पक्षांतर केलेल्या पदाधिकाऱ्यांशी झालेली हुज्जत एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत झालेल्या प्रकारामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत

लग्नाच्या मांडवात राजकीय राडा
नारायणगाव : राजकीय पदाधिकाऱ्याच्या लग्नात पक्षांतर केलेल्या पदाधिकाऱ्यांशी झालेली हुज्जत एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत झालेल्या प्रकारामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत या घटनेवरून चांगलेच वादळ माजले आहे़ दोनही पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याने राजकीय वातावरण तप्त झाले आहे.
मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचे लग्न सोहळयात झालेल्या प्रकारामुळे जुन्नर तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे़ शिवसेनेचा एक पंचायत समिती सदस्य आपला माणूस आपली आघाडी पक्षाच्या जवळ गेल्याने राजकीय वातावरण तप्त झाले़ शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य तालुक्याच्या प्रमुख पदावर कार्यरत आहे़ त्याने एका स्थानिक चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत एक पंचायत समिती सदस्य आमदार सोनवणे यांच्या पक्षाच्या वाटेवर आहे़, असा प्रश्न विचारण्यात आला़ यावर गेल्या अडीच वर्षापासून संबंधित सदस्य तनाने शिवसेनेत आहे. परंतु मनाने आमदार सोनवणे यांच्या सानिध्यात असल्याचे वक्तव्य केले होते़ मनसे पदाधिकाऱ्याच्या लग्नसोहळयात स्टेजवर जाताना संबंधीत पदाधिकारी लोकप्रतिनिधींबरोबर दिसून आला़ यावेळी शिवसेनेचे प्रमुख तसेच विद्यमान जि़ प़ सदस्या व त्यांचे कार्यकर्ते यांना पाहून संबंधित पंचायत समिती सदस्य व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादविवाद झाला़ ़ सर्वजण बाहेर आल्यानंतर त्यांच्यात शिवीगाळ सुरू झाली़ उपस्थित शिवसैनिकांनी पं़ स़ सदस्यावर धाव घेतली़ या सदस्याने प्रतिवार करीत शिवसैनिकांवर धावून जाण्याचा प्रकार केला़ दोन बाजूने झालेल्या शिवीगाळ व एकमेकांवर धावून जाण्याच्या प्रकारामुळे उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळी व लग्न सोहळयास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना आश्चर्याचा धक्का बसला. काही जणांनी मध्यस्थी करून हा प्रकार थांबविला़