पोलिओ डोस आता मिळणार इंजेक्शनद्वारे
By Admin | Updated: August 21, 2015 02:31 IST2015-08-21T02:31:28+5:302015-08-21T02:31:28+5:30
पोलिओचा तोंडातून देण्यात येणारा डोस आता इंजेक्शनद्वारे देणे शक्य होणार आहे. राज्यभरात जानेवारी २०१६ पासून इंजेक्टेबल पोलिओ लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे

पोलिओ डोस आता मिळणार इंजेक्शनद्वारे
पुणे : पोलिओचा तोंडातून देण्यात येणारा डोस आता इंजेक्शनद्वारे देणे शक्य होणार आहे. राज्यभरात जानेवारी २०१६ पासून इंजेक्टेबल पोलिओ लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे. आरोग्यविभागातर्फे सुरुवातीला राज्यातील काही ठिकाणीच ही लस उपलबध होणार आहे. त्याची चाचणी घेऊन मगच पुढील आराखडा ठरविण्यात येणार असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.
पोलिओची लस तोंडावाटे देण्यावरही काही मर्यादा आहेत. पोलिओचे संपूर्ण निर्मूलन झाल्यानंतरही काही काळ तोंडावाटे लस दिल्यास पुढे पोलिओचे विषाणू आपले स्वरुप बदलून त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे जगातील प्रगत देशांमध्येही आता तोंडावाटे लस देण्यापेक्षा पोलिओचे इंजेक्शन देण्यात येते.
त्याच धर्तीवर भारतातही ही पद्धती अवलंबावी यादृष्टीने मागील बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न चालू होते. या प्रयत्नांना योग्य तो मार्ग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सर्व प्रगत देशात इंन्जेक्शनद्वारेच पोलिओची लस देण्यात येते. पी १,पी२ आणि पी ३ या विषाणूंमुळे पोलिओची बाधा होते.
या तिन्ही विषाणंूचा प्रतिकार करण्यासाठी इंजेक्टेबल पोलिओ लसीकरण अधिक फायदेशीर
आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेही पोलिओ इंन्जेक्शनचा पुरस्कार केला असून, त्याच्यातर्फे विविध स्तरावर जागृतीही करण्यात येत आहे.
पुढील वर्षभरात महाराष्ट्रासोबत देशातील विविध राज्यांत पोलिओच्या इंजेक्शनची मोहिम राबविण्यात
येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)