पोलीस बंदोबस्तात खडकवासला धरणातून पाणी सोडणार
By Admin | Updated: May 4, 2016 04:35 IST2016-05-04T04:35:35+5:302016-05-04T04:35:35+5:30
खडकवासला धरणातील पाणी दौंड, इंदापूरला पिण्यासाठी नवा मुठा उजवा कालव्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य

पोलीस बंदोबस्तात खडकवासला धरणातून पाणी सोडणार
यवत : खडकवासला धरणातील पाणी दौंड, इंदापूरला पिण्यासाठी नवा मुठा उजवा कालव्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांनी दिली.
मंगळवारी (दि. ३) यवत (ता.दौंड) येथे पुरंदर-दौंडचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता बी.बी. लोहार, दौंड विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, दौंडचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पाटबंधारे खात्याचे अधिकारी व्ही. एन. जाधव, सुहास साळुंखे, आर. डी. गायकवाड, पी. डी. शिंदे, विद्युत वितरण कंपनीचे, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दौंड, इंदापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत असल्याने पाणी सोडण्यात येणार आहे. खडकवासला धरणातील पाणी मंगळवारपासून (दि.३) १३ मेपर्यंय नवा मुठा उजव्या कालव्यातून १ टीएमसी सोडण्यात येणार आहे. पाण्याच्या पाण्याचा शासकीय पुरवठा ज्या तलावातून होतो त्या तरंगवाडी, शिर्सुफळ (ता. इंदापूर), दौंड शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव, वरवंड, माटोबा, खामगाव-शेलारवाडी (ता.दौंड) हे पिण्याच्या पाण्याचे तलाव, तसेच नवा मुठा उजव्या कालव्याचे जवळ असलेल्या हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विहिरी या सोडण्यात येणाऱ्या खडकवासल्याच्या पाण्यातून भरणार आहेत. खडकवासला धरणातील पाणी नवा मुठा उजव्या कालव्यातून सोडताना या कालव्यावरील सर्व उपसा सिंचन पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. संपूर्ण कालव्यावर सात भरारी पथके दिवसरात्र तैनात करण्यात आली आहेत. कालव्यावरील सर्व वितरिकांचे दरवाजे पूर्णपणे वेल्डिंग करण्यात आले आहेत.
हे पाणी फक्त पिण्यासाठीच सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी, शेतकऱ्यांनी कोणतीही गडबड-गोंधळ करू नये. या भरारी पथकात पोलीस, महसूल,
पाटबंधारे, विद्युत विभागाचे अधिकारी असणार आहेत
नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. या कालव्याद्वारे पाणी चालू असेपर्यंत दोन कार्यकारी अभियंता, चार उप-अभियंता, पंचवीस शाखा अभियंता, चाळीस कालवा निरीक्षक, तीनशेचे जवळपास इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. खडकवासला धरण ते इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात जेथून पाणी सोडण्यात येणार आहे ते २०२ किमी अतंरात प्रत्येक भरारी पथक साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर दिवसरात्र व्हीडीओ शूटिंग करणार आहे.
- डी. बी. लोहार, मुख्य कार्यकारी अभियंता
खडकवासला धरणापासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. फुरसुंगी ते इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. हे पाणी पिण्यासाठीच सोडण्यात येणार आहे. दरम्यानच्या कालावधीत पाणी चोरी करणारांची गय केली जाणार नाही.
- राजेंद्र मोर,पोलीस उपअधिक्षक, दौंड विभाग