आता जाहिरातींमधून पोलिसांना मिळणार ‘महसूल’
By Admin | Updated: November 14, 2016 02:37 IST2016-11-14T02:37:41+5:302016-11-14T02:37:41+5:30
पोलीस दलाचा ‘वेल्फेअर फंड’ वाढवण्यासाठी नवीन शक्कल लढविण्यात आली असून, पोलीस विभागांच्या जागा जाहिरात एजन्सीजना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात

आता जाहिरातींमधून पोलिसांना मिळणार ‘महसूल’
लक्ष्मण मोरे / पुणे
पोलीस दलाचा ‘वेल्फेअर फंड’ वाढवण्यासाठी नवीन शक्कल लढविण्यात आली असून, पोलीस विभागांच्या जागा जाहिरात एजन्सीजना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांच्या पूर्वपरवानगीने जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पोलीस दलाचा ‘महसूल’ वाढणार आहे.
राज्यातील विविध पोलीस घटकांकडे मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा पडून आहेत. यातील बऱ्याचशा जागा शहरी भागाला जोडणाऱ्या किंवा मोक्याच्या ठिकाणी आहेत. जाहिरात कंपन्या अशा जागांच्या शोधात असतात. सहसा लोकांच्या दृष्टीस पडतील अशा जागा जाहिरात एजन्सीजना हव्या असतात. मोक्याच्या ठिकाणी जाहिरातींचे फलक लावून त्यामधून चांगला पैसा या कंपन्या कमावतात. त्यापोटी जागामालकांनाही चांगला मोबदला मिळतो. पोलीस दलाकडे अशाच पडून असलेल्या किंवा जाहिरातींसाठी दिल्या जाऊ शकणाऱ्या जागा जाहिरात कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव आलेला होता.
त्यावर विचार करून पोलीस विभागाच्या जागा या कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पोलीस महासंचालकांची पूर्वपरवानगीची अट घालण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण कार्यालय, पोलीस लाईन आणि विविध पोलीस आस्थापनांच्या रस्त्यालगतच्या भागात हे फलक लावण्यात येणार आहेत.
सर्व पोलीस आस्थापना, पोलीस लाईन, पोलीस विभागांच्या जागांचे प्रमुख यांना अशा ठिकाणांची पाहणी करुन जाहिराती लावण्यासंदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवण्याच्या सूचना राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.