थापलिंग यात्रेत पोलिसांवर दगडफेक

By Admin | Updated: January 6, 2015 22:58 IST2015-01-06T22:58:47+5:302015-01-06T22:58:47+5:30

नवसाचे बैलगाडे पळविण्याच्या वादातून थापलिंग (नागापूर, ता. आंबेगाव) येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी अज्ञात १०० ते १५० व्यक्तींविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Police threw stones at the Thapling Yatra | थापलिंग यात्रेत पोलिसांवर दगडफेक

थापलिंग यात्रेत पोलिसांवर दगडफेक

मंचर/निरगुडसर : नवसाचे बैलगाडे पळविण्याच्या वादातून थापलिंग (नागापूर, ता. आंबेगाव) येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी अज्ञात १०० ते १५० व्यक्तींविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दगडफेकीत संजय बबन गिलबिले हे पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्या डोळ्याला चार टाके पडले आहे. त्यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर मयूर दशरथ काचाळे (रा. पिंपळवंडी, जुन्नर) यांना पोलिसांनी उशिरा ताब्यात घेतले आहे.
श्रीक्षेत्र थापलिंग येथील यात्रेला सोमवारी सुरुवात झाली. नवसाचे बैलगाडे पळविण्याची येथे परंपरा आहे. मात्र, बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने या वेळेची यात्रा शर्यतीविना पार पडली.
पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन बैलगाडे पळवू नका, असे आवाहन केले होते. परंतु त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली होती. संभाव्य धोका ओळखून थापलिंग यात्रेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी पोलीस निरीक्षक मोहन जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, ज्योती उमाळे तसेच २५ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
नवसाचे बैलगाडे पळविण्यासाठी काही भाविक बैलगाड्यासह आले होते. मात्र, पोलिसांनी न्यायालयाचा निकालाचा आदर ठेवून बैलगाडे पळवू नका, असे आवाहन केले. शर्यतीच्या घाटाच्या दोन्ही बाजूंना १० ते १२ हजार प्रेक्षक बसले होते.
दीडच्या सुमारास घाटाच्या खालील बाजूला जमलेल्या लोकांपैकी १ बैलगाडा गर्दीतून पुढे आला. इतर लोकांनी बैलगाडे सुरू करण्यास आग्रह धरला, त्या वेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम व नागापूर ग्रामस्थांनी, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे;
त्यामुळे शर्यती घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले.
सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी जमलेल्या लोकांना समजावून सांगावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. त्यानंतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी घाटाच्या पायथ्याशी जमा झाले. नियमाप्रमाणे बैलगाडा शर्यत होऊ शकत नाही, असे आवाहन पोलिसांनी केले.
ग्रामस्थांच्या मदतीने एक टॅ्रक्टर ट्रॉली घाटाच्या पायथ्याशी उभी करण्यात आली. तसेच पोलीस व्हॅन उभी करण्यात आली. जमलेल्या लोकांनी त्याला विरोध केला. विरोध करणाऱ्या लोकांना दूर करून पोलीस घाटात ट्रॉली लावत होते. घाटात लावण्यासाठी दुसरी ट्रॉली आणत असल्याचे पाहून शर्यती पाहण्यासाठी जमलेल्या लोकांपैकी १०० ते १५० लोकांनी अचानक बेकायदा गर्दी जमवून ‘पोलीस बैलगाडा शर्यती बंद करीत आहेत, त्यांना तसा
अधिकारी नाही. पोलिसांना घाटात थांबू देऊ नका’ असे म्हणून चारही बाजूंनी दगडफेक करण्यास
सुरुवात केली.
एका इसमाने संजय बबन गिलबिले या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यात दगड मारला. त्या वेळी पोलीस अधिकारी तोरडमल यांनी
दगडफेक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या उजव्या पायाच्या घोट्याजवळ दगड लागला आहे. तर, महिला पोलीस बोरकर यांच्या उजव्या तळहातावर दगड लागून जखमा झाल्याचे समजते.
जखमी पोलीस कर्मचारी संजय बबन गिलबिले यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात १०० ते १५० व्यक्तींविरोधात सरकारी कामात जखमी करून अडथळा आणणे तसेच बेकायदेशीर जमाव जमवून दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर दशरथ काचाळे (रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

सर्वाेच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने शर्यती भरवू नका, असे आवाहन केले होते. थापलिंग देवस्थान ट्रस्टीने सहकार्य केले होते. आजची परिस्थिती लगेच नियंत्रणात आली. प्रेक्षक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते; मात्र नागापूर ग्रामस्थांनी सहकार्य केले. नागरिकांनी संयम पाळावा.
- मोहन जाधव
पोलीस निरीक्षक मंचर पोलीस ठाणे

 

 

Web Title: Police threw stones at the Thapling Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.