पोलिसांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: January 8, 2015 00:16 IST2015-01-08T00:16:13+5:302015-01-08T00:16:13+5:30
कात्रज येथे उभ्या असलेल्या मोटारीला दोनदा हटकल्याने तीन तरूणांनी पोलिसावर हल्ला करून जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणला.

पोलिसांना कारणे दाखवा नोटीस
पुणे : कात्रज येथे उभ्या असलेल्या मोटारीला दोनदा हटकल्याने तीन तरूणांनी पोलिसावर हल्ला करून जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणात पोलिसांनी वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने भारती विद्यापीठ पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. दरम्यान यातील तीनही आरोपींची न्यायालयाने १५ हजार रूपयांच्या जामीनावर सुटका केली.
ॠषीकेश ऊर्फ बाबू दत्तात्रय पायगुडे (वय १९), रामेश्वर अशोक राजेभोसले (वय २२), अभिजित आत्मराम पायगुडे (वय २२, तिघे राहणार कुडजे ग्रामपंचायतीसमोर, ता. हवेली) अशी आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे नेमणुकीला असलेले गणेश सुभाष चिंचकर याने फिर्याद दिली. ही घटना ५ नोव्हेंबर २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. आरोपी हे तिघे एका कारमध्ये होते. त्यांची कार अंधारात उभी असल्याने चिंचकर यांनी त्यांना हटकले व पुढे जाण्यास सांगितले त्यानंतर पुन्हा कात्रज बायपास हायवेवर ते उभे दिसल्याने चिंचकर व त्यांच्या सोबतच्या पोलीस शिपायाने त्यांना हटकून त्यांना पुन्हा तिथून जाण्यास सांगितले. या गोष्टीचा राग येऊन आरोपींनी संगनमत करून त्यांनी चिंचकर यांना दगडाने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्यांना न्यायालयासमोर सादर करून त्यांची पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी घेण्यात आली.
(प्रतिनिधी)
४आरोपींनी अॅड सुचित मुंदडा यांच्या मार्फत जामीन अर्ज केला. पोलिसांनी कायद्यानुसार ६० दिवस उलटून गेले तरी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद अॅड मुंदडा यांनी केला. न्यायालयाने रिमांडच्या कागदपत्रांची पाहणी केली. त्यावरून आरोपींना अटक झाल्यापासून ते सध्या तुरूंगात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच घटनेला ६२ दिवस झाले तरी पोलीसांनी आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.