"संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, न्यायालयानेच लक्ष घालावे"

By नम्रता फडणीस | Published: October 10, 2023 03:11 PM2023-10-10T15:11:13+5:302023-10-10T15:12:21+5:30

न्यायालयानेच लक्ष घालण्याची ॲड .सरोदे यांची मागणी...

"Police reluctant to register case against Sambhaji Bhide, court should pay attention" | "संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, न्यायालयानेच लक्ष घालावे"

"संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, न्यायालयानेच लक्ष घालावे"

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांवर महात्मा गांधी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संस्थेचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केला. मात्र, याप्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाली असून, याप्रकरणात न्यायालयाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी याचिकाकर्ते तुषार गांधी यांचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी सोमवारी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात केली.

न्यायालयात युक्तिवाद करताना, ॲड सरोदे म्हणाले, महात्मा गांधी यांच्याबाबत अनेक पुस्तके असताना देखील मनोहर भिडे यांनी दुर्लक्षित पुस्तक शोधून काढून नाट्यमय पद्धतीने त्याची सर्वांसमोर मांडणी करण्यात आली. महात्मा गांधी तसेच त्यांची आई यांच्या चारित्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केली गेली. त्यामुळे याबाबत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जी २० परिषदेत वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी भारतात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर महात्मा गांधी यांच्या राजघाटावरील समाधीवर गेले. अशाप्रकारे देशाची ओळख जगात महात्मा गांधी यांच्यामुळे आहे. अशा व्यक्तीबाबत ,त्यांच्या परंपरा बाबत तसेच वंशावळी संदर्भात आव्हान दिले गेले. याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. मात्र, पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने तसेच भिडे हे एका पक्षाशी निगडित असलेले त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणात एफ आय आर दाखल न केल्याने न्यायालयाच्या आदेशांचा अवमान झालेला आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ जबाबदारीच नाही तर त्यांचे कर्तव्य देखील योग्य भूमिकेतून पार पाडणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

महात्मा गांधी यांना मानणाऱ्या लोकांबाबत घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून याप्रकरणी योग्य ती कलमे लावून गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. पोलिसांनी त्यांची जबाबदारी नाकारल्यामुळे याप्रकरणी न्यायालयाने लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: "Police reluctant to register case against Sambhaji Bhide, court should pay attention"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.