पुण्यात पोलिसांनी दडपला ओबींसींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:42+5:302020-12-04T04:30:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ओबीसी आरक्षण बचावसाठी गुरुवारी सकाळी निघणारा मोर्चा पोलिसांनी नेत्यांनाच ताब्यात घेत दडपला. माजी खासदार ...

Police in Pune cracked down on OBCs | पुण्यात पोलिसांनी दडपला ओबींसींचा मोर्चा

पुण्यात पोलिसांनी दडपला ओबींसींचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ओबीसी आरक्षण बचावसाठी गुरुवारी सकाळी निघणारा मोर्चा पोलिसांनी नेत्यांनाच ताब्यात घेत दडपला. माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह कृती समितीच्या सर्व नेत्यांनाच पोलिसांनी शनिवारवाड्याजवळ ताब्यात घेतले व फरासखाना पोलिस ठाण्यावर नेले. मोर्चाला राजकीय स्वरूप आले, अशी टीका करत भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी प्रदेश अध्यक्षांनी मोर्चाकडे पाठ फिरवली.

समीर भुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय ओबीसा नेत्यांच्या उपस्थितीत गुरूवारी सकाळी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार होता. त्यासाठी सगळे कार्यकर्ते शनिवारवाड्याजवळ जमले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चवधरी व अन्य नेते यावेळी उपस्थित होते.

फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी भुजबळ यांच्यासह सर्व नेत्यांना तिथेच ताब्यात घेतले व फरासखाना पोलिस ठाण्यात आणले.

त्यामुळे शनिवारवाड्याजवळ जमा झालेले आंदोलक गडबडले. उपस्थित पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही, असे सांगत सर्वांना तिथून दूर केले. त्यामुळे बहुतेकांनी आपापल्या वाहनांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणे पसंत केले. दरम्यान फरासखाना पोलिसांनीही नेत्यांना तुम्हाला गाडीतून तिथे नेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे तेही पोलिसांच्या गाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले.

तिथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने निवेदन दिले. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त असल्याने तिथे जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधीकडे निवेदन दिले. त्यात ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करू नये, ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचे निवारण करावे अशा मागण्या नमुद केल्या आहेत.

सरकार आमचेच आहे, त्यामुळे आमच्या मागण्यांना नक्की न्याय मिळेल अशी भावना माजी आमदार दीप्ती चवधरी व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांनी व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले, आम्ही त्यांना सहकार्य केले, आमचे म्हणणे आम्ही सरकारी प्रतिनिधींपर्यंत पोहचवले, असे चाकणकर यांनी सांगितले.

दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी या मोर्चाला राजकीय स्वरूप आले असल्याची टीका केली. तिथे शरद पवार व राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे फलक होते. त्यामुळेच आपण तिथे गेलो नाही. नियोजनाच्या बैठकीत तसे करायचे नाही असे ठरले होते, मात्र त्याचे पालन झाले नाही असे त्यांनी सांगितले.

Web Title: Police in Pune cracked down on OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.