पोलीस अधिकाऱ्यानेच लुटली ९६ लाखांची रोकड

By Admin | Updated: November 5, 2015 02:20 IST2015-11-05T02:20:36+5:302015-11-05T02:20:36+5:30

हडपसर पोलीस ठाण्याच्या एका सहायक पोलीस निरीक्षकाने वासन आय केअर कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मोटारचालकाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील कर्मचाऱ्यांच्या बोनसची

Police officials looted Rs 9.6 lakh cash | पोलीस अधिकाऱ्यानेच लुटली ९६ लाखांची रोकड

पोलीस अधिकाऱ्यानेच लुटली ९६ लाखांची रोकड

पुणे : हडपसर पोलीस ठाण्याच्या एका सहायक पोलीस निरीक्षकाने वासन आय केअर कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मोटारचालकाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील कर्मचाऱ्यांच्या बोनसची तब्बल ९६ लाख रुपयांची रोकड लुटली. या लुटीमध्ये त्याच्यासोबतचे कर्मचारीही सहभागी झाले होते. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिकाऱ्यासह चार जणांना गजाआड केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक गिरिधर यादव, पोलीस कर्मचारी गणेश मोरे यांच्यासह अविनाश देवकर आणि रवींद्र सोपान माने अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी विशाल देविदास धेंडे (वय ३३, रा. पांडवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासन आय केअर कंपनीचे अधिकारी डॉ. ठाकूर आणि त्यांचे सहकारी मांजरी येथील गंधर्व रेसिडेन्सी नावाच्या हॉटेलमध्ये होते. त्या वेळी मोटारचालक धेंडे हॉटेलखाली उभे होते. कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्यासाठी कंपनीच्या खात्यामधून काढण्यात आलेले ६० लाख तसेच विविध केंद्रांवरचे ३६ असे एकूण ९६ लाख रुपये धेंडेंजवळ होते.
तेथे पोहोचलेले यादव व कर्मचारी मोरे या दोघांसह देवकर आणि माने यांनी धेंडे यांना मारहाण करून जबरदस्तीने मांजरी पोलीस चौकीत नेले. तेथून हडपसर पोलीस ठाण्यात आणले. त्यांना विविध प्रश्न विचारून रात्री बारापासून बुधवारी पहाटे चारपर्यंत त्रास दिला. तसेच, धेंडेंकडील ९६ लाख रुपये घेऊन त्यांना बाहेर हकलण्यात आले. धेंडे यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. या सर्वांना रात्री उशिरा अटक केली असून, निरीक्षक राजेंद्र मोहिते तपास करीत आहेत.


सहायक निरीक्षक गिरिधर यादव रात्रपाळी नसतानाही रात्री हॉटेलवर गेलेच कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या पोलीस ठाण्यात रुबाबात नोकरी केली, त्याच ठाण्यामध्ये आरोपी म्हणून गजाआड होण्याची वेळ यादव यांच्यावर आली. ज्यांच्या हाताखाली काम केले, तेच वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते आता यादव यांच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Police officials looted Rs 9.6 lakh cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.