सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: September 8, 2014 04:00 IST2014-09-08T04:00:45+5:302014-09-08T04:00:45+5:30
गणेश विसर्जनासाठी शहर पोलीस दलाने कंबर कसली असून, घातपाती कारवायांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने चोख उपाययोजना केल्या आहेत

सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
पुणे : गणेश विसर्जनासाठी शहर पोलीस दलाने कंबर कसली असून, घातपाती कारवायांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने चोख उपाययोजना केल्या आहेत. लक्ष्मी रस्त्यासह मध्यवस्तीतील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अकरा हजार पोलिसांचे मनुष्यबळ रस्त्यांवर खडा पहारा देणार आहे. यासोबतच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहे.
विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण ४ हजार ३४ नोंदणीकृत मंडळे आहेत. या मंडळांपैकी २२९ मंडळे लक्ष्मी रस्त्यावरून, १६१ मंडळे टिळक रस्त्यावरून, १३४ मंडळे कुमठेकर रस्त्यावरून, तर १२३ मंडळे केळकर रस्त्यावरून मिरवणूक काढतात. गेल्या वर्षी जवळपास २५ तास चाललेली मिरवणूक यंदा त्यापेक्षा कमी वेळात संपवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी गेल्या वर्षी मंडळांना आधीच रांगेत लावून घेण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर पोलिसांनी स्वत: जागोजाग सीसीटीव्ही बसविले आहेत, तर खासगी आस्थापनांच्या सीसीटीव्हींचाही पोलिसांना उपयोग होणार असून, मंडळांनीही पोलिसांना सहकार्य करीत विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसवून घेतले आहेत.
विसर्जन घाटांवर विशेष बंदोबस्त नेमण्यात आला असून, सीसीटीव्ही, बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या टीम्स, जीवरक्षक, अग्निशामक दलाचे पथक, रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, विसर्जन मार्गांवरही ठिकाणे निश्चित करून तेथेही अत्यावश्यक सेवा देणारी वाहने उभी करण्यात येणार आहेत. महिलांनी मौल्यवान ऐवज, लहान मुले आणि वृद्धांनाही सांभाळावे, असे आवाहन पाठक यांनी केले आहे. गणेशोत्सवामध्ये महिला छेडछाड, चोरी, सोनसाखळी चोरी आदी प्रकार घडल्यास बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना तातडीने त्याची माहिती द्यावी. पोलिसांनी शहरामध्ये जागोजाग वाहन तपासणी सुरू केली आहे. ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. या टॉवर्सवर हत्यारबंद पोलिसांचा पहारा असणार आहे. दुबिर्णीद्वारे गर्दीतील टवाळ आणि भामट्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)