पोलीस सुटीवर; कोंडी रस्त्यावर
By Admin | Updated: October 26, 2015 01:41 IST2015-10-26T01:41:16+5:302015-10-26T01:41:16+5:30
गेल्या वर्षी महापालिकेने वाहतुकीस अडथळा होत असल्याचे कारण पुढे करीत डांगे चौकातील ‘आठवडे बाजार’ बंद करण्याचा निर्णय घेतला

पोलीस सुटीवर; कोंडी रस्त्यावर
आठवडे बाजारामुळे कोंडी
वाकड : गेल्या वर्षी महापालिकेने वाहतुकीस अडथळा होत असल्याचे कारण पुढे करीत डांगे चौकातील ‘आठवडे बाजार’ बंद करण्याचा निर्णय घेतला,मात्र चौकातील बीआरटी पुलाचे काम पूर्णत्वाकडे जाताच मोठ्या प्रमाणावर पुन्हा बाजार थाटू लागल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
डांगे चौकातील दुहेरी पुलाखालील जागा पथारी व्यावसायिकांनी गिळंकृत केला आहे,त्यातच चौकाच्या चारही बाजूच्या पदपथावर भाजी व्यावसायिक, विक्रेते तसेच दुकानदारांनी समोर आपले बस्थान मांडल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरली नाही परिणामी त्यांना अति वर्दळीच्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
डांगे चौकातील उड्डाणपुलाच्या खाली भररस्त्यावर पथारीवाल्यांनी दुकाने थाटून एका बाजूने जाणारी वाहतूक पूर्णपणे अडविली परिणामी दुसऱ्या बाजूने वहानांचा लोंढा अडकून वाहतुकीस अडथळा होत आहे.
चौकात गर्दीच गर्दी
भोसरी : रविवार सुट्टीचा दिवस, बहुतांशी नोकरदार व मुलांच्या सुट्टीचा दिवस त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक घरा बाहेर पडलेले, मात्र घरा पासून अगदी जवळ असलेल्या भोसरीच्या दिघी रस्ता परिसरात खरेदीला जाणाऱ्या नागरिकांना कळेना काय झाले काहींनी आपल्या पाहिले चौकात गर्दी झाली आहे. वाहने कशीही इकडून तिकडे असलने वाहतूक कोंडी झाली असल्याने सर्वच वाहने जागच्या जागी उभी. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसच नाही. यावेळी नागरिकांनी चौकशी केली असता वाहतूक पोलीस सकाळ पासून कोणीच दिसत नाहीत. सुट्टी दिवशी सायंकाळच्या वेळेला या परिसारत मोठी गर्दी असते असे असताना वाहतूक पोलिस फिरकतच नाहीत रविवारी जणूकाही सर्वाना साप्ताहिक सुट्टी आहे, त्यामुळे पोलिस मामा ही रविवारी दिसत नाहीत अशी चर्चा हि नागरिकांच्या मध्ये चांगलीच रंगाला येत होती.
भोसरीतील आळंदी रस्ता हा येथील मुख्य बाजारपेठेचा भाग त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांचा कायम वावर असतो. मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अनधिकृत पणे पार्किंग
केलेले असते. तसेच रस्त्याच्या
दोन्ही बाजूला खाद्य पदार्थांच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणावर
आहेत. भोसरीचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे.
इंद्रायणीनगरमध्ये वाहतूक कोंडी
इंद्रायणीनगर : वेळ सकाळी १० वाजून २० मिनिटांची... पुणे -नाशिक महामार्गावरील गोडाऊन चौकातील सिग्नल... निवांतपणे गप्पा मारत बसलेले वाहतुक नियंत्रण कक्षाचे कर्मचारी... भरधाव धावणारी अवजड वाहने, जीव मुठीत धरून चालणारे दोन चाकी वाहन धारक, व रस्ता ओलांडत असतांना जिवाच्या आकांताने पळणारी सामान्य जनता. ...ही कुठल्या पुस्तकातील गोष्ट नसून, इंद्रायणीनगर मधील गोडाऊन चौकातील भीषण वास्तव आहे.
दहा रस्त्यांच्या वाहतूक नियंत्रणाचा भार असलेल्या या महामार्गावरील महत्त्वाच्या चौकात सकाळी व संध्याकाळच्या वेळेस वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
फक्त २४ पोलीस
पिंपळे गुरव : जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी व पिंपळे गुरव परिसरातील लाखो वाहनचालकांसाठी व शेकडो चौकांसाठी फक्त २४ वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. रस्त्यावर व मुख्य चौकामध्ये वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांचा अभाव, बंद असलेले वाहतूक दिवे, वेगवान वाहतूक, खासगी व्यावसायिक, हातगाड्यांचा गराडा, नो पार्किंग व रस्त्यात उभी असलेली वाहने आदींमुळे परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमच ऐरणीवर येत आहे. वाहतूक पोलिसाकडून कारवाई होत नसल्याने या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणार तरी कोण, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
सांगवी फाटा, बीआरटी रस्त्यालगत सांगवी वाहतूक विभाग आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. मात्र वर्षानुवर्षे वाहतूक पोलिसांची संख्या दर वर्षीसारखीच आहे.
जुनी सांगवीत शितोळेनगर चौक, गुरुनानक चौक, तसेच नवी सांगवीत फेमस चौक, साई चौक, पिंपळे गुरव परिसरात कृष्णा चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, जिजामाता चौक, तसेच दापोडीतील शितळादेवी चौक, डॉ. आंबेडकर चौक आदी भागात वाहतूक दिवे आहेत. मात्र कोणत्याही चौकात वाहतूक पोलीस किंवा वॉर्डन दिसत नाही.
पोलीस गैरहजर
चिंचवड : परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जात नसल्याचे वास्तव समोर येत आहे. बहुतांशी मुख्य चौकात वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. वाहन चालाक मनमानी करत असल्याचे दिसत आहे. वाहतूक शाखेच्या अनियोजित कारभारामुळे अवैध वाहतूक जोमात सुरु आहे.
मोशी वाहतूक कोंडी
मोशी : मोशीतील टोलनाका, भारत माता चौक, मोशी मुख्य चौक जुना जकात नाका, राजे शिवछत्रपती चौक असे चौक पुणे-नाशिक मुख्य महामार्गावर आहेत. या चौकामध्ये पोलिसांकडून आवश्यक ती उपाययोजना केलेली नाही. राजे शिवछत्रपती चौकात वाहतूककोंडी, तर नित्याचाच विषय बनला आहे.