पोलीस दल अधिक लोकाभिमुख करणार
By Admin | Updated: October 26, 2015 01:58 IST2015-10-26T01:58:41+5:302015-10-26T01:58:41+5:30
न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवणे हा आमचा पहिला उद्देश असून, निर्दोष सुटणाऱ्या खटल्यांच्या कारणांचा अभ्यास करून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी तक्रारदार

पोलीस दल अधिक लोकाभिमुख करणार
पुणे : न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवणे हा आमचा पहिला उद्देश असून, निर्दोष सुटणाऱ्या खटल्यांच्या कारणांचा अभ्यास करून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी तक्रारदार, साक्षीदार आणि पंचनाम्याची व्हिडीओग्राफी करून ‘डिजिटल एव्हीडेन्स’ तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व पोलिसांना देण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या दीक्षितांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागावी यासाठी शासनाने सक्त आदेश दिले आहेत. पोलिसांकडूनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून, सीआयडीचेही विशेष प्रयत्न सुरू आहेत. बऱ्याचदा तक्रारदार, पंच आणि साक्षीदार फितूर होतात, तसेच न्यायालयाच्या मनात शंका निर्माण केल्या जातात, त्यामुळे या सर्वांचे व्हिडीओ चित्रीकरणाच्या सूचना देण्यात आल्याचे दीक्षित म्हणाले.
पोलीस ठाणे स्तरावर शांतता मोहल्ला कमिट्यांच्या माध्यमातून कम्युनिटी पोलिसींग चालत होते. मात्र, त्याच्याही पलीकडे जात आता पोलिसांच्या कामात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटक, सशक्त ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि चांगल्या वर्तणुकीचे नागरिक व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यांना पोलिसांसोबत काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये नाव व मोबाईल क्रमांक नोंदवावेत, असेही दीक्षित यांनी सांगितले. या पोलीस मित्रांची मदत नाकाबंदी, गस्त, छेडछाड रोखणे, वाहतूक नियमन यासाठी होणार आहे.