घरफोडी करणार्यांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: May 18, 2014 23:49 IST2014-05-18T23:49:36+5:302014-05-18T23:49:36+5:30
कर्वेनगरमध्ये घरफोडी करून सुमारे १२ लाख रुपयांचे सोने, हिरे, चांदीचे दागिने, डॉलर चोरणार्या २ आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली

घरफोडी करणार्यांना पोलीस कोठडी
पुणे : कर्वेनगरमध्ये घरफोडी करून सुमारे १२ लाख रुपयांचे सोने, हिरे, चांदीचे दागिने, डॉलर चोरणार्या २ आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असताना न्यायदंडाधिकार्यांनी आरोपींना २२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी हे घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. राजबीरसिंग बाबुलालसिंग चौहान (वय २७, रा. फारूखनगर, जि. गुडगाव, रा. हरियाणा) आणि धर्मेंद्र छोटेलाल शर्मा (वय २८, रा. कसबा क्लान, ता. जलालाबाद, जि. शहाजपूर, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पौर्णिमा जयंत पडबिद्री (वय ६३, रा. कर्वेनगर) यांनी या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा ३ एप्रिलला घडला होता. पडबिद्री घरात नसताना दुपारी दरवाज्याचे लोखंडी ग्रील कापून, लॅचलॉक तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील ११ लाख ७८ हजार ६५० रुपयांचे हिर्यांचे, सोन्याचे, चांदीचे दागिने आणि डॉलर चोरून नेले होते. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, चोरलेला ऐवज हस्तगत करायचा असल्याने आणि यासाठी त्यांनी कोणत्या हत्यारांचा वापर केला, याचा तपास करायचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. (प्रतिनिधी)