पीएमपीची आर्थिक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 03:12 IST2015-09-24T03:12:24+5:302015-09-24T03:12:24+5:30
दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) संचलन तूट देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चालढकल केली जात आहे.

पीएमपीची आर्थिक कोंडी
पुणे : दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) संचलन तूट देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे पीएमपीची आर्थिक कोंडी होत असून, पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न वाढले असले तरी जमाखर्चाचा ताळमेळ बसविणे प्रशासनास अवघड जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल ८० लाखांहून अधिक नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २००७ मध्ये पीएमपीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पीएमपीची संचलन तूट मोठ्या प्रमाणात वाढत असून, कंपनी डबघाईला आली आहे. त्यामुळे पीएमपी अधिक सक्षम करण्यासाठी राज्यशासनाने फेब्रुवारी २०१३ मध्ये दोन्ही महापालिकांनी पीएमपीला वार्षिक संचलन तूट ६०-४० अशा स्वरूपात द्यावी असा आदेश दिला. त्यानुसार, ही तरतूद देण्यात येत आहे. मात्र, ती अनियमित स्वरूपात आणि वर्षाच्या शेवटी देण्यात येत असल्याने मोठी रक्कम देण्यास दोन्ही महापालिकांच्या सदस्यांकडून विरोध केला जात होता.
त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दोन्ही महापालिकांना विनंती करून पीएमपीची येणारी संचलन तूट दोन्ही महापालिकांनी समान १२ हप्त्यांमध्ये द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, रक्कम पूर्ण न देता अर्धवट स्वरूपात दिली जात आहे. (प्रतिनिधी)