पीएमपीला ‘बिझनेस प्लॅन’ची संजीवनी
By Admin | Updated: December 23, 2015 00:13 IST2015-12-23T00:13:07+5:302015-12-23T00:13:07+5:30
दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत रूतत चाललेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) स्थिती सुधारण्यासाठी आता खास ‘बिझनेस प्लॅन’ राबविला जाणार आहे.

पीएमपीला ‘बिझनेस प्लॅन’ची संजीवनी
पुणे : दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत रूतत चाललेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) स्थिती सुधारण्यासाठी आता खास ‘बिझनेस प्लॅन’ राबविला जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून पुढील नऊ महिन्यांत हा आराखडा तयार केला जाणार आहे. तर त्यानंतर पुढील दोन वर्षे या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्नस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस हे काम देण्यात आले असून या प्लॅनसाठी तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी ५ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून या कंपनीबरोबर चार वर्षांचा करार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २००७ मध्ये पीएमटी आणि पीसीएमटीचे विलिनीकरण करून पीएमपीएमएल ही कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र, या कंपनीच्या स्थापनेपासूनच ती सातत्याने तोट्यात असून गेल्या सात वर्षांत हा तोटा १६७ कोेटी रुपयांवर पोहचला आहे. तर कंपनीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याने त्याचा प्रवासी संख्या घटण्यावर परिणाम झाला आहे. तसेच पीएमपीला मिळणारे इतर पर्यायी उत्पन्नही मिळणे कमी झाले आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारण्यासाठी पीएमपीकडून सुमारे तीन वर्षांपूर्वी जेएनएनयुआरएम अंतर्गत हा बिझनेस प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या.
मात्र, केंद्रशासनाने निधी देण्यास नकार दिल्याने ही निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र, हा प्लॅन आवश्यक असल्याने तो दोन्ही महापालिका आणि पीएमपीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्लॅनसाठी पुणे महापालिकेने २ कोटी रुपयांचा निधी दिला असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हिस्सा मिळाल्यानंतर उर्वरीत खर्च पीएमपीएमएलकडून करण्यात येणार आहे.
पुण्याचे महापौर दतात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर सुशीला धारडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पीएमपीचे संचालक आनंद अलकुंटे यांच्यासह स्थायी समिती अध्यक्षा आश्विनी कदम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अजय शितोळे, सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे या वेळी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
ज्या कंपनीस हे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून पुढील नऊ महिन्यांत हा प्लँन तयार केला जाईल. त्यात प्रामुख्याने पीएमपीसाठी आवश्यक असलेली टेक्नॉलॉजी, अस्तित्वातील टेक्नॉलॉजीचे अपग्रेडेशन, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना, उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना, पीएमपीच्या अस्तित्वातील मालमत्तेचा वापर करून उत्पन्न वाढविण्याच्या उपाययोजना, मार्गांचे सुसूत्रीकरण, उत्पन्न वाढीसाठी इतर पर्यायी स्रोतांची निर्मिती, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना, वाढत्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करणे. तसेच पीएमपीची प्रतिमा सुधारण्याची जबाबदारीही या कंपनीवर असणार आहे. अशा प्रकारचा आराखडा तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे या सल्लागार कंपनीकडून केवळ आराखडा केला जाणार नाही. तर पुढील तीन वर्षे ही कंपनी या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पीएमपीसोबत काम करणार असून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचीही जबाबदारी कंपनीवर असणार आहे.