पीएमपी दिसणार डिजिटल नकाशावर

By Admin | Updated: March 22, 2017 03:31 IST2017-03-22T03:31:37+5:302017-03-22T03:31:37+5:30

बसथांब्यावर तासन्तास ताटकळत उभ्या राहणाऱ्या बसप्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांना आता मोबाईलवरच बसच्या प्रत्यक्ष वेळा कळणार आहेत.

The PMP will appear on the digital map | पीएमपी दिसणार डिजिटल नकाशावर

पीएमपी दिसणार डिजिटल नकाशावर

राजानंद मोरे / पुणे
बसथांब्यावर तासन्तास ताटकळत उभ्या राहणाऱ्या बसप्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांना आता मोबाईलवरच बसच्या प्रत्यक्ष वेळा कळणार आहेत. प्रवासी ज्या बसथांब्यावर उभे असतील, त्याठिकाणी बस कधी येणार, सध्या कुठे आहे याची सर्व माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) लवकरच एका मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पण केले जाणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी ‘पीएमपी’ ही सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आहे. सुमारे दहा लाखांहून अधिक प्रवाशांसाठी ‘पीएमपी’कडून बससेवा पुरविली जाते. दररोज शेकडो मार्गांवर जवळपास चार हजारांहून अधिक थांबे असून दररोज सुमारे १४०० ते १५०० बस मार्गांवर धावतात. शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढत निश्चित ठिकाणी पोहोचण्याची कसरत बसचालकांना करावी
लागते.
यादरम्यान अनेकदा कोंडीमध्ये बस अडकते, कधी ब्रेकडाऊन होते तसेच इतर कारणांमुळे अचानक बसफेऱ्या रद्द कराव्या लागतात. मात्र, फेऱ्या रद्द झाल्याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे प्रवासी नियमितपणे येणाऱ्या बसची वाट पाहत थांब्यावर उभे असतात. बस कधी येणार, ती सध्या कुठे आहे याबाबत ते पूर्णपणे अनभिज्ञ असतात. त्यामुळे अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करीत इतर पर्यायांचा आधार घेतात. मागील काही वर्षांपासून याचा फटका पीएमपीला बसला आहे. प्रवासी संख्या कमी होण्याबरोबरच उत्पन्नातही घट होत आहे.
पुढील काळात मात्र ‘पीएमपी’ प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत प्रशासनाकडून लवकरच एक मोबाईल अ‍ॅप सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पीएमपीने सर्व बसना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. सध्या ‘ट्रॅफी’ हे अ‍ॅपचे नाव असून ते डाऊनलोडही करता येत आहे. त्यावर बसची माहितीही उपलब्ध होत
आहे.
अ‍ॅपचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याची माहिती ‘पीएमपी’तील सूत्रांनी दिली.

Web Title: The PMP will appear on the digital map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.