‘पीएमपी’ला मिळाले २७ कोटी

By Admin | Updated: January 7, 2015 00:38 IST2015-01-07T00:38:08+5:302015-01-07T00:38:08+5:30

महापालिकेच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच कोणतेही आढेवेढे न घेता, ‘पीएमपी’साठी २६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

The PMP received 27 crores | ‘पीएमपी’ला मिळाले २७ कोटी

‘पीएमपी’ला मिळाले २७ कोटी

पुणे : तोट्यातील ‘पीएमपी’वर केवळ टीका आणि टीकाच करून, आर्थिक मदत देण्यास आखडता हात घेणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच कोणतेही आढेवेढे न घेता, ‘पीएमपी’साठी २६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यात नगर आणि आळंदी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गासाठी आयटीएमएस प्रणालीसाठी ११ कोटी ९७ लाख रुपये, पीएमपीची संचलन तूट भरून काढण्यासाठी १० कोटी रुपये; तसेच विद्यार्थी पास योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे तोट्यातील पीएमपीला आर्थिक हातभार लागणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी ही माहिती दिली.
गेल्या महिनाभरापासून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, पीएमपीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याने आधी कारभार सुधारावा, त्यानंतर निधी द्यावा, अशी भूमिका समिती सदस्यांकडून घेतली जात होती. मात्र, पीएमपीच्या सुधारणेसाठी प्रशासकीय कारभार मुद्रांक शुल्क आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे देण्यात आला असून, त्यांनीही पीएमपी सक्षम करण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून हा निधी मंजूर केला असल्याचे कर्णे यांनी सांगितले, तर डॉ. परदेशी यांच्याकडे पदभार असल्याने मनसेचाही त्यास विरोध राहणार नसल्याचे गटनेते बाबू वागसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

‘पीएमपी’साठी
‘स्थायी’ची खास सभा
४तोट्यातील पीएमपी बाहेर काढण्यासाठी; तसेच पीएमपीच्या सुधारणेसाठी भविष्यात केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यासाठी पुढील मंगळवारी स्थायी समितीने विशेष बैठक बोलाविली आहे. या बैठकीत डॉ. श्रीकर परदेशी सादरीकरण करणार असून, स्थायी समितीपुढे पीएमपीसाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांसाठीची माहिती देणार असल्याचे कर्णे यांनी या वेळी सांगितले.

पीएमपीला ‘अच्छे दिन’
४पालिकेने निधी मंजूर केल्यामुळे पीएमपीला नवसंजीवनी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
४यामध्ये बिघाड झालेल्या गाड्यांची समस्येचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत होता. पालिकेने निधी मंजूर केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या निधीतून पीएमपीचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार आहे.
४यामुळे पीएमपीच्या प्रवाशांमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे. पीएमपी शहरासहीत जिल्ह्याच्या काही भागात जाते.
४एकूणच तोट्यात गेलेल्या पीएमपीला ‘अच्छे दिन’ आले असल्याचेच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

Web Title: The PMP received 27 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.