उपाययोजनांमुळे पीएमपी नफ्यात
By Admin | Updated: January 14, 2015 03:20 IST2015-01-14T03:20:39+5:302015-01-14T03:20:39+5:30
गेल्या काही वर्षांपासून तोट्याच्या गर्तेत असलेल्या पीएमपीएमएलच्या प्रवास नफ्याकडे सुरू झाला आहे

उपाययोजनांमुळे पीएमपी नफ्यात
पुणे : गेल्या काही वर्षांपासून तोट्याच्या गर्तेत असलेल्या पीएमपीएमएलच्या प्रवास नफ्याकडे सुरू झाला आहे. गेल्या महिनाभरात पीएमपी सक्षमीकरणासाठी संचालकांकडून राबविण्यात येत असलेल्या ठोस उपाययोजनांमुळे मासिक १६ कोटी रुपयांची असलेली संचलन तूट ८ कोटी रुपयांवर आली असून, प्रतिबस उत्पन्न ९ हजार रुपयांवरून तब्बल १२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी स्थायी समितीसमोर पीएमपीच्या उपाय योजनांचे सादरीकरण केले. तसेच, याबाबतचा सुधारणा कार्यक्रम मांडला. या वेळी ही माहिती देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
परदेशी यांनी आज प्रथमच स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीत त्यांनी मागील तीन महिन्यांत केलेल्या उपाययोजना व सद्य:स्थितीबाबत सदस्यांना माहिती दिली.
पीएमपीच्या ताफ्यातील ८० टक्के बस रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे प्रवासी संख्याही वाढली असून, सरासरी उत्पन्न ९ हजारांहून सुमारे १३ हजार रुपयांपर्यंत वाढले आहे. याचा परिणाम १६ कोटींपर्यंतची मासिक तूट कमी होऊन ती ८ कोटी रुपयांवर आली आहे. ताफ्यातील ९१ टक्के बस रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)