पीएमपी निधी वादावर तोडगा नाहीच
By Admin | Updated: October 27, 2015 01:11 IST2015-10-27T01:11:43+5:302015-10-27T01:11:43+5:30
पीएमपीएमएलकडून भाडे कराराने घेण्यात आलेल्या पाच ठेकेदारांच्या तब्बल ६५३ बसेसची थकीत देणी देण्याबाबत सोमवारी महापालिकेने घेतलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही

पीएमपी निधी वादावर तोडगा नाहीच
पुणे : पीएमपीएमएलकडून भाडे कराराने घेण्यात आलेल्या पाच ठेकेदारांच्या तब्बल ६५३ बसेसची थकीत देणी देण्याबाबत सोमवारी महापालिकेने घेतलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. ठेकेदारांनी पुन्हा ब्रेकडाऊनचा इशारा दिल्याने, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी ही बैठक बोलाविली होती. या बैठकीत पीएमपी प्रशासनाला महापालिकेकडून अद्याप मागील बैठकीत आश्वासन दिल्याप्रमाणे निधी मिळाला नसल्याचे सांगितले. तर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा दोन दिवसांत पीएमपीचे २७ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, ३१ आॅक्टोबरपर्यंत बिले न मिळाल्यास ब्रेकडाऊनबाबत काहीही सांगता येत नसल्याचे संबंधित ठेकेदारांकडून पुन्हा एकदा सांगण्यात आले.
पीएमपीच्या ताफ्यातील बसेसची संख्या कमी असल्याने महालक्ष्मी आॅटोमोटिव्ह, ट्रॅव्हल टाईमकार, महालक्ष्मी ट्रान्स्पोर्ट, अँथोनी गॅरेज, बीव्हीजी इंडिया या कंपनीकडून ६५३ बसेस भाडे कराराने घेतल्या आहेत. या बसेसची तब्बल ६0 कोटींची देणी पीएमपीने थकविल्याचा पवित्रा घेत या पाचही ठेकेदारांनी आपल्या बसेसचे संचलन १ आॅक्टोबर रोजी बंद केले होते. त्याचा फटका तब्बल ७ लाख प्रवाशांना बसला होता. या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त कुणाल कुमार तसेच महापौरांनी या ठेकेदारांची बैठक घेऊन मागील महिन्याच्या बिलाची रक्कम ५ आॅक्टोबर रोजी देण्यात आली तर उर्वरित २५ टक्के रक्कम अजूनही देण्यात आलेली नाही. तसेच १६ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंतची रक्कम १५ आॅक्टोबर रोजी देण्याचे आश्वासन देऊनही ती अद्याप देण्यात आलेली नाही असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आमचीही थकीत देणी असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत ही रक्कम न मिळाल्यास आॅपरेशनल ब्रेकडाऊन होईल असा इशारा या पत्रात देण्यात आलेला आहे.
या शिवाय, त्यास पूर्णत: पीएमपी प्रशासन जबाबदार राहणार असून, बसेस बंद राहिल्यास करारानुसार, पीएमपीने आम्हाला प्रतिबस २०० रुपये देण्याची जबाबदारी असेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यातच महापालिकेकडून पीएमपीला दरमहा देण्यात येणार साडेआठ कोटींचा संचलन तुटीचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे ब्रेकडाऊनचा इशारा देण्यात आला होता. त्यावर या बैठकीत पुन्हा केवळ चर्चाच झाली असून, कोणताही तोडगा निघालेला नाही.
येत्या दोन दिवसांत पीएमपीच्या संचलनतूट आणि इतर देय असलेली तब्बल २९ कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून यावर वाद सुरू आहे. तसेच या बैठकीत ठेकेदारांच्या इतर प्रश्नांबाबतही चर्चा झालेली असून त्यांनी त्याबाबत अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार करावी त्यानंतर त्याची सुनावणी घेण्याचा निर्णय झाला. निधीशिवाय बिले नाहीत
महापालिकेकडून देय असलेली रक्कम अद्याप आलेली नाही. ही रक्कम त्वरित देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले तत्काळ देण्यात येतील. तसेच ठेकेदारांकडून आणखी काही समस्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल.
- अभिषेक कृष्णा
(अध्यक्ष)