पीएमपीच्या चालकाला मारहाण

By Admin | Updated: April 27, 2017 05:03 IST2017-04-27T05:03:27+5:302017-04-27T05:03:27+5:30

पीएमपी बसचालकाला बसमध्ये चढून मारहाण करण्यात आली. वाहनचालक किरण

PMP driver beat | पीएमपीच्या चालकाला मारहाण

पीएमपीच्या चालकाला मारहाण

पिंपरी : पीएमपी बसचालकाला बसमध्ये चढून मारहाण करण्यात आली. वाहनचालक किरण अभिमन्यू राऊत यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी मात्र केवळ अदखलपत्र गुन्हा नोंदवून घेतला आहे. आरोपीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
पीएमपीच्या बसवर किरण राऊत हे हंगामी स्वरूपात चालकाचे काम करतात. १५ एप्रिलला ते रात्री तळवडे येथे एम एच १४, सी डब्ल्यू १९४३ क्रमांकाची बस घेऊन जात होते. तेथे असलेल्या मोकळ्या जागेत ही बस उभी करण्यासाठी जात असताना, दोन जण बसला आडवे आले. त्यांनी हात दाखविल्याने चालकाने बस थांबवली. त्या वेळी आरोपी बसमध्ये चढला. बसमध्ये आल्यानंतर त्याने चालकाला शिवीगाळ केली. हातात असलेले फुटके भांडे चालक किरण याच्या डोक्यात मारले. जखमी करून आरोपी तेथून पसार झाला. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. चालक किरण याने थेट पोलीस चौकी गाठली. डोक्यात मार लागलेल्या अवस्थेत पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. तेथून वायसीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेतले.
आरोपीने मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असतानाही पोलिसांनी मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. चालकाच्या डोक्यात जे भांडे मारले होते, त्या भांड्यावर शारूख शेख असे लिहिले होते, त्याआधारे फिर्यादीने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र, एवढे सर्व काही करूनही पोलिसांनी पुढील कार्यवाही केली नाही. पोलिसांनी आरोपीला कठोर शासन करावे, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेणार असल्याचे किरण राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: PMP driver beat