दुचाकीला धडक बसून सांडलेल्या पेट्रोलमुळे पीएमपीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:23+5:302021-02-23T04:16:23+5:30
चंदननगर: नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात एका दुचाकीस्वाराने बसला ओव्हर टेक करताना झालेल्या अपघातात आपला जीव गमावला. बसच्या बाजूने दुचाकीस्वार ...

दुचाकीला धडक बसून सांडलेल्या पेट्रोलमुळे पीएमपीला आग
चंदननगर: नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात एका दुचाकीस्वाराने बसला ओव्हर टेक करताना झालेल्या अपघातात आपला जीव गमावला. बसच्या बाजूने दुचाकीस्वार पुढे गेला आणि बसच्या समोर येऊन खाली पडला. या धडकेत बसने दुचाकीला फरपटत नेले. दुचाकीतील पेट्रोल सांडल्याने आणि बसच्या घर्षणाने आग लागली. त्यात संपूर्ण बस जळून गेली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघात सोमवार सकाळी 10:20 दरम्यान घडला, अशी माहिती विमानतळ पोलिसांनी दिली.
पीएमपीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार अजिंक्य येवले (वय २६) याचा या अपघातात मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की, नगर रस्त्यावर खराडी बायपास चौकाच्यापुढे दर्गा येथे पुण्याहून वाघोलीच्या दिशेने पीएमपी बस जात होती. तर अजिंक्य हा दुचाकीवरून पुण्याकडे येत होता. तो बीआरटी मार्गातून समोर आला आणि बसला त्याची धडक बसली. बस वेगात असल्याने तो बसच्या समोर दुचाकीसह सुमारे २२ फूट फरपटत गेला. त्यात दुचाकीतील पेट्रोल खाली पडले आणि स्पार्कही झाल्याने पीएमपीला आग लागली. त्यात संपूर्ण बस जळाली. बसमध्ये सुमारे २०-२५ प्रवासी होते. ते लगेच बसखाली उतरले, त्यामुळे त्यातील कोणालाही इजा झाली नाही. मात्र दुचाकीस्वार अजिंक्य येवलेचा मात्र मृत्यू झाला.
----------------
नगर रस्त्यावर वाहतूककोंडी
बस जवळपास अर्धातास जळत होती आग विझवण्याचे बंब तब्बल अर्धा तास उशिरा आल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान बघ्यांची गर्दी वाढल्याने नगर रस्त्यावर खराडीबायपास ते खराडी जुना जकातनाका दरम्यान वाहतूककोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर वाहतूक सुरळीत झाली.
---------------
बीआरटीत अपघात झाल्यास मिळत नाही विमा
बीआरटी मार्गातून सामान्य नागरिकांच्या वाहनाला परवानगी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून बीआरटी मार्गात घुसल्याने अनेक अपघात झाले आहेत. परंतु, अनेक नागरिक हा नियम न पाळता मार्गातून जाण्याचा प्रयत्न करतात. एखाद्याचा विमा काढलेला असेल, तर बीआरटी मार्गात अपघात होणाऱ्याला त्या विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जीवही जातो आणि विमाही मिळत नाही. त्यामुळे या मार्गातून नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन वेळोवेळी पीएमपीकडून केले जाते.
-------------------