पीएमपीची गाडी रुळावर
By Admin | Updated: February 10, 2015 01:34 IST2015-02-10T01:34:06+5:302015-02-10T01:34:06+5:30
तीन-चार वर्षांत गॅरेजमध्येच अडकलेली पीएमपीची गाडी आता रुळावर येऊ लागली आहे. नियमितपणे ८० टक्के बस मार्गावर आणण्यासाठी सुरू

पीएमपीची गाडी रुळावर
पुणे : तीन-चार वर्षांत गॅरेजमध्येच अडकलेली पीएमपीची गाडी आता रुळावर येऊ लागली आहे. नियमितपणे ८० टक्के बस मार्गावर आणण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांना काही दिवसांतच यश मिळेल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. सोमवारपर्यंत ७७ टक्के बस मार्गावर आल्या असून, पुढील १५ दिवसांत हा आकडा ८० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास पीएमपी अधिकारी व्यक्त करीत आहेत.
रोजचा लाखो रुपयांचा तोटा, सुट्ट्या भागांअभावी गॅरेजमध्ये बंद पडलेल्या शेकडो बसेस, नियोजनाचा अभाव, प्रशासनातील निष्काळजीपणा अशा अनेक समस्यांच्या गाळात पीएमपीचे चाक रुतले होते. मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मार्गावरील बसेसची संख्या ६४ टक्क्यांपर्यंत खाली आली. त्यात पीएमपीच्या मालकीच्या बसेसचा वाटा ५५ टक्के होता. दिवसागणिक वाढत चाललेल्या तोट्यामुळे चोहोबाजूने प्रशासनाला धारेवर धरले जात होते. चांगली सेवा मिळत नसल्याने प्रवाशांमध्येही नाराजी होती.
या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकर परदेशी यांनी १४ डिसेंबरला पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त भार स्वीकारला. त्यानंतर व्यवस्थापनाला शिस्त लावण्यासाठी व ताफ्यातील ८० टक्के गाड्या मार्गावर आणण्यासाठी अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याची घोषणा केली. मार्गावर ८० टक्के गाड्या नियमितपणे धावल्याशिवाय वेतन न करण्याचा निर्णय घेतल्याने अधिकारीही कामाला लागले. या निर्णयामुळे मागील दीड महिन्यात पीएमपीने जणू कात टाकण्यास सुरुवात केली. सोमवारी सकाळच्या सत्रात ताफ्यातील २१०३ बसेसपैकी १६२५ म्हणजे ७७ टक्के बस मार्गावर धावल्या. आता केवळ ३ टक्के म्हणजे आणखी सुमारे ६० बस मार्गावर आल्यानंतर ‘मिशन ८० टक्के’ पूर्ण होणार आहे. त्यासाठी सर्वच अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)