सुरक्षारक्षकांसमोरच पळवली पीएमपी बस
By Admin | Updated: March 19, 2015 00:19 IST2015-03-19T00:19:59+5:302015-03-19T00:19:59+5:30
सुरक्षारक्षकासमोरच एका चोरट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस चोरून नेल्याची घटना मार्केट यार्ड येथे मंगळवारी मध्यरात्री घडली.

सुरक्षारक्षकांसमोरच पळवली पीएमपी बस
पुणे : सुरक्षारक्षकासमोरच एका चोरट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस चोरून नेल्याची घटना मार्केट यार्ड येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. पीएमपीच्या मार्केट यार्ड डेपोबाहेर रात्री बस उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यातील एक बस अज्ञात व्यक्तीने नेली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पीएमपीच्या बसला चालू करण्यासाठी चाव्याच नसल्याची धक्कादायक माहिती या घटनेवरून समोर
आली आहे.
पीएमपीच्या मार्केट यार्ड डेपोमधील बसला पार्किंग करण्यासाठी डेपोमध्ये पुरेशी जागा नसल्याने अनेक बस रात्री रस्त्यावर पार्क केल्या जातात. अशातच डेपोमध्ये कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने बहुतांशी बस रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे डेपोसमोर ही बस पार्क केली होती. बसच्या रखवालीकरिता ३ वॉचमन कार्यरत होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास एक बस (क्र. एमएच १२ एफ सी ३१२५) सुरू करण्यात आल्याचे एका सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. पहिल्यांदा ती बस पीएमपीच्या चालकानेच चालू केल्याचे रक्षकाला वाटले. त्यामुळे रक्षकाने आवाज दिला. त्यानंतरही चालकाने बस न थांबविल्याने संबंधित रक्षकाने इतर सुरक्षारक्षकांना बोलविले. बसची चोरी होत असल्याचे लक्षात आल्याने सुरक्षारक्षकांनी एका चालकाच्या मदतीने दुसऱ्या बसमधून चोराचा पाठलाग केला. मार्केट यार्ड डेपोपासून उत्सव चौकापर्यंत हा पाठलाग करण्यात आला. मात्र, चोरट्याने बस जोरात चालविल्याने तो कोठे गेला, हे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले नाही. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पीएमपीच्या सुरक्षा अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. रात्री सायंकाळपर्यंत त्याचा तपास सुरू होता. (प्रतिनिधी)
४मार्केट यार्ड डेपोत अशोक लेलॅन्ड कंपनीच्या अनेक बस आहेत. या बसला कंपनीने चाव्याच देण्यात आलेल्या नाहीत. या बस एका बटनावर चालू होतात. चोरीला गेलेली बस अशोक लेलॅन्ड कंपनीचीच होती. त्याला चावी नसल्याने चोरट्याला ती लगेचच चोरून नेणे शक्य झाले, असे मार्केट यार्ड आगाराच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.