- जयवंत गंधाले हडपसर : सातववाडी गोंधळनगर हा प्रभाग क्रमांक १६ सध्याचा असून, पूर्वीचा क्रमांक २३ आहे. पूर्वीच्या प्रभागांमध्ये आकाशवाणी व १५ नंबर लक्ष्मी कॉलनी हा अधिकचा परिसर वाढला आहे. या प्रभागाची मतदार संख्या ९३ हजार आहे. मागील निवडणुकीत येथून तीन भाजपचे, तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक निवडून आला होता. या प्रभागांमध्ये कचरा, वाहतूक कोंडी, अनियमित पाणीपुरवठा अशा मुख्य समस्या असून, या परिसरात २४ बाय ७च्या पाणी योजनेसाठी मीटर बसवण्यात आले आहेत. मात्र, नियमित एक तास पण पाणी येत नाही.
या प्रभागात पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी अपूर्ण आहेत. मात्र, पाण्याच्या टाकीतून पाणी वितरित केले जात नाही. त्याचप्रमाणे ससाणेनगर, १५ नंबर, रवी दर्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. उड्डाणपूल असूनही या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे आहे. त्याचप्रमाणे सोलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनाही मोठा फटका बसतो. आरोग्याच्या समस्यांसाठी कोणतेही मोठे हॉस्पिटल नाही. दर्जेदार अशा सुविधा नाहीत. या ठिकाणाहून दोन कॅनॉल जातात. मात्र, या कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. महात्मा फुले वसाहत, जिजामाता, शांतीसागर, डवरी, वेताळबाबा या वसाहतीमध्ये पाणीपुरवठा व आरोग्याच्या समस्या मोठ्या आहेत. सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही. महिला व पुरुषांना कॅनॉलच्या दोन्ही बाजूस बसावे लागते. गेल्या ४० वर्षांत काही विकास असा ठोस झालेला दिसत नाही. डीपी रस्त्याचे काम अर्धवट आहे. सायकल ट्रॅक आहे, पण त्याची देखभाल नसल्याने त्याचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
समस्या
१) हडपसरमध्ये पार्किंगची समस्या
२) पर्यायी रस्ते उपलब्ध नसल्याने सतत वाहतूक कोंडी
३) हडपसर गावठाणात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अशुद्ध गढूळ मैला मिश्रित पिवळसर काळसर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
३) जागोजागी पडलेला कचऱ्याचा मोठा प्रश्न
४) महानगरपालिकेच्या सुलभ शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था, महिला शौचालयांची, महिला स्वच्छताग्रहांची कमतरता
५) पाचशे बेडच्या सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची अत्यंत आवश्यकता
६) सातववाडी गोंधळेनगर काळेपडळ ससाणे नगर अंतर्गत रस्त्यांची दारुण अवस्था
७) जुना बंद बेबी कालव्यामुळे अस्वच्छतेमुळे आरोग्याची मोठी समस्या
८) मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यावरील भाजीपाला, फळे व इतर वस्तूंच्या विक्रीच्या अनधिकृत पथारी व्यावसायिक (अतिक्रमण समस्या मोठी)
९) आजूबाजूच्या परिसरात कचरा डेपो असल्यामुळे सतत दुर्गंधी, माश्या
उपलब्ध असलेल्या अण्णासाहेब मगर आरोग्य केंद्रात ज्येष्ठ रुग्णांची हेळसांड होते तसेच त्यांना जी औषधे हवी ती औषधे अनेक वेळा हेलपाटे मारूनसुद्धा मिळत नाहीत. -विलास शेलार, स्थानिक नागरिक
प्रभागात भाजी मंडई व हडपसर मार्केट असल्याकारणाने खरेदीला येणाऱ्या ग्राहकांना आपल्या चारचाकी व दुचाकीसाठी पार्किंगची अधिकृत सोय नसल्याकारणाने अनेक नागरिकांना कारवाईला बळी पडून भुर्दंड पडतो. - अनिल धायगुडे, स्थानिक नागरिक
अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा आम्हाला पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नाही. सुरुवातीला अर्धा ते पाऊण तास आम्हाला पाणी तसेच सोडावे लागते. कारण, ते पाणी काळसर, पिवळसर, दुर्गंधीयुक्त असते. त्यानंतर येणारे पाणी आम्हाला पिण्यासाठी घ्यावे लागते. नंतर येणारे पाणीसुद्धा शुद्ध कसे समजायचे. खरंतर हे पाणी अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे. -नंदा ससाणे, स्थानिक नागरिक
Web Summary : Satavwadi and Gondhalnagar face perennial water scarcity, traffic jams, and garbage issues despite being part of PMC. Unregulated water supply, encroached roads, and lack of healthcare facilities plague residents. Basic amenities like toilets are also inadequate.
Web Summary : पीएमसी का हिस्सा होने के बावजूद सातववाड़ी और गोंधल नगर में पानी की कमी, ट्रैफिक जाम और कचरे की समस्या बनी हुई है। अनियमित जलापूर्ति, अतिक्रमण वाली सड़कें और स्वास्थ्य सुविधाओं की कमी निवासियों को परेशान करती है। शौचालय जैसी बुनियादी सुविधाएं भी अपर्याप्त हैं।