पुणे : पक्षाला चांगले दिवस आल्याने आपल्याला नगरसेवक पदावर काम करण्याची संधी मिळेल, अशी मनीषा बाळगून मागील काही वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असल्याने पक्षातील निष्ठावंतांचे चेहरे कोमेजू लागले आहेत. ज्यांच्या विरोधात काम करून प्रभागात पक्ष वाढवला, त्यांचेच काम करण्याची वेळ येत असेल तर मग राजकारण सोडलेले बरे, अशी नाराजी भाजपमधील अनेक इच्छुक खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत.
महापालिकेची निवडणूक साडेतीन वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आठ ते साडेआठ वर्षांनंतर नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. ही संधी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा विचार करता मागील २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये पराभव झालेले अनेकजण लाखो रुपये खर्च करून पुढच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. राज्यातील आणि केंद्रातील सरकारच्या योजनांच्या माध्यमातून स्वत:ची प्रतिमा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पक्षाला फायदेशीर ठरेल अशी चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने महापालिका निवडणुकीत नक्कीच यश मिळेल. त्यासाठी केवळ पक्षाची उमेदवारी मिळविण्याचे आव्हान पार करावे लागणार आहे, हे ओळखून अनेक भाजप निष्ठावंत नेत्यांकडे फिल्डिंग लावत आहे.
मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह इतर राजकीय पक्षातील बडे नेते आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने भाजपमधील माजी नगरसेवकांसह आजवर संधी न मिळालेले इच्छुक चिंताग्रस्त झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कमी होऊ लागला आहे. ज्यांच्या विरोधात लढून प्रभागामध्ये पक्षाची ताकद वाढवली, त्यांनाच पक्षाकडून पायघड्या घालण्यात येत असल्याने आम्ही केवळ सतरंज्याच उचलायच्या का?, असा संतप्त सवाल अनेक इच्छुक खासगीत बोलताना उपस्थित करत आहेत. पुढील काही दिवसांत भाजपमध्ये आणखी इनकमिंग होणार आहे, त्यामुळे आपल्या प्रभागातील कोणी पक्षात येणार नाही ना अशी चिंता भाजपमधील निष्ठावंत इच्छुकांना सतावत आहे.
Web Summary : Pune BJP hopefuls, preparing for PMC polls, feel sidelined by incoming leaders. Loyalists, who worked against these figures, question their future role as newcomers gain prominence, fearing lost opportunities after years of anticipation.
Web Summary : पुणे भाजपा के उम्मीदवार, पीएमसी चुनावों की तैयारी कर रहे हैं, आने वाले नेताओं से अलग-थलग महसूस कर रहे हैं। निष्ठावान, जिन्होंने इन आंकड़ों के खिलाफ काम किया, अपनी भविष्य की भूमिका पर सवाल उठाते हैं क्योंकि नवागंतुक प्रमुखता प्राप्त करते हैं, वर्षों की प्रत्याशा के बाद खोए हुए अवसरों से डरते हैं।