पुणे : महापालिका निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार २ काँग्रेसला जागा मिळाल्या. त्यामुळे गेल्या वेळेच्या तुलनेत काही जागा वाढल्या तरी अपेक्षित यश मिळाले नाही. अंतर्गत उणिवा, चुकीची रणनीती आणि संवादाच्या अभावामुळे अपेक्षित यश मिळविता आले नाही. आघाडीतील उद्धवसेना आणि मनसेची न मिळालेली साथ तसेच राष्ट्रवादीसोबत न जाता एकप्रकारे भाजपलाच अप्रत्यक्षरीत्या मदतच केल्याचे बोलले जात आहे.
‘राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत’ हे समीकरण मांडण्यात अपयश महाविकास आघाडीच्या राजकारणात पुण्यातील मतदार संभ्रमात होता. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेले मत अप्रत्यक्षपणे भाजपला फायदेशीर ठरू शकते, ही भूमिका काँग्रेस प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवू शकली नाही. भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक स्पष्टता आणि आक्रमक प्रचाराचा अभाव स्पष्टपणे जाणवला. परिणामी, विरोधी मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फटका काँग्रेसला बसला.
आघाडी असूनही उद्धवसेनेविरोधात उमेदवारी
महाविकास आघाडीचा घटक असतानाही पुणे शहरात तब्बल २४ ठिकाणी उद्धवसेनेविरोधात उमेदवार देण्यात आले. या निर्णयामुळे आघाडीतील एकजूट कागदापुरतीच असल्याचे चित्र मतदारांसमोर गेले. ‘आघाडी आहे की नाही?’ असा प्रश्न सामान्य मतदारांना पडला आणि त्याचा फायदा थेट भाजपला झाला. स्थानिक पातळीवरील समन्वयाचा पूर्ण अभाव हा काँग्रेसच्या राजकीय अपरिपक्वतेचा नमुना ठरला.
नवीन चेहरे, ‘आयात’ नेत्यांचा अभाव
पुण्यात काँग्रेसला नवे, ऊर्जावान चेहरे पुढे आणण्यात अपयश आले. तसेच अन्य पक्षांतून प्रभावी नेते आयात करण्यातही पक्ष अपयशी ठरला. परिणामी, अनेक मतदारसंघांत जुने, थकलेले चेहरेच समोर आले. बदलाची अपेक्षा असलेल्या मतदारांना काँग्रेसकडून काहीच नवे दिसले नाही. भाजप आणि अन्य पक्षांनी नव्या चेहऱ्यांवर भर दिला, तर काँग्रेस मात्र जुन्याच चौकटीत अडकून राहिली. याला अपवाद केवळ प्रशांत जगताप ठरले. त्यांनी आपल्या प्रभागात स्वत:सह आणखी एकाला निवडून आणले.
अंतर्गत वादामुळे ढासळले दिग्गजांचे गड
पक्षांतर्गत गटबाजी, नेतृत्वावरून कुरघोडी आणि समन्वयाचा अभाव यामुळे काँग्रेसची संघटना कमकुवत झाली. अनेक दिग्गज नेत्यांना आपले पारंपरिक बालेकिल्ले शाबूत ठेवता आले नाहीत. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, ती वेळेत दूर करण्यात नेतृत्व अपयशी ठरले. ‘पक्षासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी राजकारण’ अशी प्रतिमा निर्माण झाली.
राष्ट्रवादीसोबत आघाडीतील अडचणी
राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यात काँग्रेसला अपयश आले. निवडून आलेल्या उमेदवारांच्या आघाडीची तुलना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची मतांशी केल्यास त्यांची बेरीज जास्त आहे. त्यामुळे आघाडी न झाल्याचा फायदा भाजपला झाला आहे.
उद्धवसेना व मनसेसोबत आघाडी करूनही फायदा झाला नाही.
पुण्यात काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या उद्धवसेना आणि मनसेसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नातून अपेक्षित राजकीय लाभ मिळालेला दिसला नाही. उलटपक्षी, या आघाड्यांमुळे काँग्रेसची स्वतंत्र ओळख अधिकच धूसर झाली आणि मतदारांमध्ये संभ्रम वाढला.
आघाडीचा संदेशच पोहोचला नाही
उद्धवसेना व मनसेसोबतची जवळीक ही तात्त्विक की केवळ निवडणुकीपुरती, याबाबत काँग्रेसकडून स्पष्ट भूमिका मांडली गेली नाही. भाजपविरोधात एकत्र लढण्याचा संदेश एकसंधपणे मतदारांपर्यंत गेला नाही. परिणामी, मतदारांना ही आघाडी ‘संधिसाधू’ वाटली, ठोस राजकीय पर्याय वाटला नाही.
मोठ्या नेत्यांची प्रचारात अनुपस्थिती
पुण्यात काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका अत्यंत मर्यादित राहिली. प्रदेशाध्यक्षांची केवळ एकच सभा वगळता, राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील कोणत्याही मोठ्या नेत्यांनी पुण्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी ठोस, प्रभावी सभा घेतल्या नाहीत. या अनुपस्थितीमुळे काँग्रेसची निवडणूक लढाई स्थानिक कार्यकर्त्यांच्या खांद्यावरच राहिली.
मोठ्या नेत्यांच्या सभांना मिळणारी गर्दी, निर्माण होणारी राजकीय हवा याचा काँग्रेसला लाभ मिळाला नाही. भाजप व इतर पक्षांनी स्टार प्रचारकांचा प्रभावी वापर करून वातावरण तापवले असताना, काँग्रेसकडे नेतृत्वाचा चेहरा आणि आक्रमक प्रचाराचा सूर दिसला नाही. यामुळे मतदारांमध्ये ‘पक्षच या निवडणुकीत गंभीर नाही’ अशी भावना निर्माण झाली. परिणामी, हा नेतृत्वाचा अभावही काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरला.
Web Summary : Pune Congress failed in 2026 PMC elections due to poor strategy, internal conflicts, and failure to convey the message that voting for NCP indirectly benefits BJP. Lack of coordination and prominent leaders also contributed to the defeat.
Web Summary : खराब रणनीति, आंतरिक कलह और यह संदेश पहुंचाने में विफलता कि राकांपा को वोट देने से अप्रत्यक्ष रूप से भाजपा को लाभ होता है, के कारण पुणे कांग्रेस 2026 पीएमसी चुनावों में विफल रही। समन्वय और प्रमुख नेताओं की कमी ने भी हार में योगदान दिया।