पीएमपीच्या प्रश्नावर सर्वतोपरी साह्य करणार
By Admin | Updated: January 28, 2015 02:37 IST2015-01-28T02:37:10+5:302015-01-28T02:37:10+5:30
‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचा (पीएमपी) कार्यभार हाती घेतल्यापासून श्रीकर परदेशी चांगले काम करीत आहेत

पीएमपीच्या प्रश्नावर सर्वतोपरी साह्य करणार
पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचा (पीएमपी) कार्यभार हाती घेतल्यापासून श्रीकर परदेशी चांगले काम करीत आहेत. पीएमपीच्या सुधारणेसाठी परदेशींना काहीही मदत हवी असल्यास त्यांनी थेट माझ्याशी बोलावे; त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल,’ अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पीएमपीच्या प्रश्नात लक्ष घालून त्याला पाठबळ दिल्याने पीएमपीची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
चाकण येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाहतूककोंडी व पीएमपीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी श्रीकर परदेशी करीत असलेल्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक केले. परदेशी यांना त्यासाठी काहीही मदत हवी असल्यास त्यांनी थेट माझ्याशी बोलावे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पीएमपीच्या ६०० बस बंद पडल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा बोजवारा उडालेला होता. यातून मार्ग काढण्यासाठी पीएमपीला तातडीने आयएएस दर्जाचा अधिकारी देण्यात येईल, असे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
गेल्या ३ महिन्यांमध्ये परदेशी यांनी पीएमपीला रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही महापालिकांच्या मुख्य सभेपुढे पीएमपीच्या सुधारणेचा दीर्घकालीन आराखडा सादर करून नेमके काय करावे लागणार आहे, याची माहिती परदेशी यांनी दिली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील वाढत्या बसची संख्या पाहता, येत्या काही वर्षात १४३ एकर जागेची आवश्यकता भासेल, असे त्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)