पीएमपीमध्ये ‘पास’ घोटाळा
By Admin | Updated: July 4, 2015 00:17 IST2015-07-04T00:17:27+5:302015-07-04T00:17:27+5:30
सुमारे अडीच लाख रुपये रकमेच्या पासची विक्री करूनही एका महिला कर्मचाऱ्याने ही रक्कम पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएमएल) जमा केलीच नसल्याचा प्रकार

पीएमपीमध्ये ‘पास’ घोटाळा
पुणे : सुमारे अडीच लाख रुपये रकमेच्या पासची विक्री करूनही एका महिला कर्मचाऱ्याने ही रक्कम पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएमएल) जमा केलीच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सुमारे अडीच महिने पास विभाग तसेच पीएमपी प्रशासनाला याचा थांगपत्ताही नव्हता. मागील आठवड्यात झालेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. संबंधित महिलेला निलंबित केले आहे. ही महिला अनुकंपा तत्त्वावर झाडूवाला म्हणून पीएमपीत नोकरी करीत होती. मात्र, तिला पास केंद्रांवर काम देण्यात आले होते.
पीएमपीला तिकीट विक्रीबरोबरच पास विक्रीतूनही मोठे उत्पन्न मिळते. पुणे व पिंपरी चिंचवडसह हद्दीबाहेरील लाखो प्रवासी पीएमपीच्या सुविधेचा फायदा घेतात. त्यामुळे दोन्ही शहरांत ४५ पास केंद्रे आहेत. या प्रत्येक केंद्रावर प्रत्येक पाळीमध्ये एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते. या कर्मचाऱ्यांना मागणीनुसार पास पुरविले जातात. दररोज झालेली पास विक्री व त्याची माहिती संबंधित आगारामध्ये द्यावी लागते. तसेच विक्रीतून जमा झालेली रक्कमही आगारात जमा करावी लागते. उर्वरित पास केंद्रातच ठेवले जातात. साधारणत: एप्रिल महिन्याच्या मध्यात प्रत्येक पास केंद्रातील पास तसेच इतर माहितीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर जूनच्या अखेरच्या महिन्यात ही तपासणी झाली. दरम्यानच्या काळात संबंधित महिला आनंदनगर पास केंद्रावर होती. या तपासणीत तिने विक्री केलेले पास व जमा केलेल्या रकमेत तफावत आढळून आली. याबाबत विभागातील अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता सुमारे अडीच लाख रुपयांचा घोटाळा समोर आला.
‘संबंधित विभागप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंंतर या महिलेला निलंबित करण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे,’ असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी दीपकसिंग परदेशी यांनी सांगितले. आधीच पीएमपी तोट्यात असताना असे घोटाळे पीएमपीला अधिक खड्डयात नेणारे आहेत. या महिलेला अनुकंपा तत्त्वावर झाडूवाली म्हणून पीएमपी सेवेत घेतले होते. प्रत्यक्षात तिला पास केंद्रात काम करण्यात सांगण्यात आले. पीएमपीमध्ये अशा सुमारे ३० झाडूवालीपदावरील महिला पास देण्याचे काम करीत आहेत. पास केंद्रात लेखनिक किंवा वाहकांची नेमणूक होणे अपेक्षित असताना या महिलांना काम देण्यात आले आहे.