पोतलेमळ्यात साडेतीन लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 03:20 IST2015-06-23T03:20:24+5:302015-06-23T03:20:24+5:30
येथील पोतलेमळा परिसरात दरोडेखोरांच्या टोळक्याने घरावर दरोडा टाकून एकास डोक्याला गंभीर दुखापत करून १५ तोळे सोने, रोख २५ हजार रुपये व सहा मोबाइल,

पोतलेमळ्यात साडेतीन लाखांची लूट
शेलपिंपळगाव : येथील पोतलेमळा परिसरात दरोडेखोरांच्या टोळक्याने घरावर दरोडा टाकून एकास डोक्याला गंभीर दुखापत करून १५ तोळे सोने, रोख २५ हजार रुपये व सहा मोबाइल, असा ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला़
दरोडेखोरांच्या मारहाणीत हनुमंत रावजी पोतले (वय ५२, रा. शेलपिंपळगाव, पोतलेमळा) गंभीर जखमी झाले असून, चाकण येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री एक-दीडच्या सुमारास पोतलेमळा येथे घडली. रविवारी रात्री दीडच्या सुमारास हनुमंत पोतले यांच्या राहत्या घरावर पाच ते सहा दरोडेखोरांनी हल्ला करून घराच्या दरवाजावर लाकडाने, तसेच पायाने लाथा घालून दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला.
दरम्यान, रात्री चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
सोमवारी सकाळी सहायक पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील, पोलीस निरीक्षक दगडू पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून श्वानपथकाकडूनही पाहणी करण्यात आली. दरम्यान, सहा दरोडेखोरांविरुद्ध चाकण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी दिली.
या घटनेमुळे शेलपिंपळगाव परिसरासह शेजारील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यातील दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी
केली आहे. (वार्ताहर)