परदेशी विद्यार्थ्यांची संस्थाचालकांकडून लूट
By Admin | Updated: July 12, 2015 00:11 IST2015-07-12T00:11:41+5:302015-07-12T00:11:41+5:30
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई)राबविल्या जात असलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेदरम्यान शहरातील काही नामांकित

परदेशी विद्यार्थ्यांची संस्थाचालकांकडून लूट
पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई)राबविल्या जात असलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेदरम्यान शहरातील काही नामांकित शैक्षणिक संस्थांकडून परदेशी विद्यार्थ्यांची तसेच भारतीय वंशाच्या परदेशी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे. त्याचप्रमाणे डीटीईची प्रवेशाची नियमावली आणि विद्यापीठाची नियमावली यात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी येत असून विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची भीती पालक व्यक्त
करत आहेत.
डीटीईने एनआरआय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत नियमावली प्रसिद्ध केली असून त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य किंवा संचालकांना भेटून प्रवेश घ्यावेत तसेच शिक्षण शुल्क समितीने निश्चित केलेले शुल्क भरून प्रवेश घ्यावा. परंतु, विद्यार्थ्यांकडून १ लाख २० हजार रुपये शुल्क घेणे अपेक्षित असताना काही संस्था मात्र, २ लाख ८० हजार रुपये शुल्काची मागणी करत आहेत. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांची लूट होत असल्याची भावना पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामार्फत प्रवेश दिले जातात. विद्यापीठाच्या व्यस्थापन परिषदेने त्यासंदर्भातील ठराव मंजूर केला आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या नियमाप्रमाणे विद्यापीठाकडून परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. मात्र, या नियमानुसार प्रवेश न देता प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत,अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या नियमावलीनुसार परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. प्रवेशप्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी विद्यापीठाने आॅनलाईन यंत्रणा उभी केली आहे. एखाद्या महाविद्यालयामधील कमी जागांसाठी जास्त अर्ज आल्यास हे प्रवेश सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेशप्रक्रियेबाबत आक्षेप घेण्यासारखा कोणताही विषय नाही.
- डॉ. विजय खरे, संचालक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
परदेशी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास राज्यातील काही मर्यादित महाविद्यालयाना एआयसीटीईतर्फे परवानगी देण्यात आली आहे. तसेच परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील नियमावली डीटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मात्र, याबाबत विद्यापीठाची नियमावली काय आहे, याचा माहिती घेतल्यानंतरच या प्रकरणाबाबत बोलणे योग्य ठरेल. सध्या यावर भाष्य करता येणार नाही.
- दयानंद मेश्राम,
सहसंचालक, डीटीई