‘सेझ’च्या नावाखाली लूट
By Admin | Updated: May 27, 2015 01:03 IST2015-05-27T01:03:17+5:302015-05-27T01:03:17+5:30
श्वेतपत्रिका प्रकाशित केली तर काँग्रेस उघड पडेल, असे वक्तव्य केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज येथे काढले.

‘सेझ’च्या नावाखाली लूट
पुणे : शेतकऱ्यांची एक इंच जमीन सुध्दा खासगी उद्योगांंसाठी, घरे बांधण्यासाठी दिली जाणार नाही, अशी घोषणा करतानाच काँग्रेस सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यांंतील किती जमीन एस.ई.झेड.च्या नावाखाली लुटली गेली, याची श्वेतपत्रिका प्रकाशित केली तर काँग्रेस उघड पडेल, असे वक्तव्य केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज येथे काढले.
भाजपाप्रणित केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहर भाजपने जनकल्याण पर्व हा जाहीर कार्यक्रम बालगंंधर्व रंगमंदिरात आयोजिला होता. खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सचिन पटवर्धन, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर आदी उपस्थित होते.
नायडू यांनी या कार्यक्रमात कॉग्रेसला टिकेचे लक्ष्य बनवित, मिश्किलपणे चिमटे काढले. काळा पैसा आणण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न, श्रीलंकेने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या तामीळ मच्छीमारांना सुखरुप देशात परत आणणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईत केलेली वाढ, गरिबांना किमान एक हजार रुपये पेन्शन, बँकांनी गरिबांसाठी उघडलेले दरवाजे, बारा कोटी लोकांनी बँकांत उघडलेली खाती, सामाजिक सुरक्षा योजना, बारा कोटी लोकांच्या खात्यात स्वयंपाकाच्या गॅससाठी देऊ केलेले अनुदान, मुद्रा बँक आदींचा उहापोह केला.
मोदी हे थ्रीडी असल्याचे नमूद करीत जनतेत विकासाविषयी उत्साह खूप आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अल्लउद्दिन सारखे जादुई यंत्र नाही तर विकासाचा मंत्र मात्र आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नायडू म्हणाले, ‘‘ब्रिटिशकालिन एक हजार कायदे रद्द केले. भुमी अधिग्रहण कायदा देशहितासाठी आम्ही आणत आहोत. शेती किफायतशीर बनण्यासाठी काय केले पाहिजे हा आमचा प्राधान्यक्रम असेल़ खासगी व्यक्तिला शेतजमीन दिली तरी ती सरकारी मालकीची राहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे़ खोटा प्रचार करुन कॉंग्रेस मोदी यांना नापास ठरवू पाहत आहे.
आमचे सरकार उद्योगपतींचे असल्याचे सांगत आहे, मात्र अदानी व अंंबानी यांचा प्रभाव त्यांच्याच सरकारच्या काळात वाढला. गरीब के लिए घोषणा, अमीर की पोषणा ही कॉंग्रेसची निती आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या योजना आणि कामे लोकांच्या दारात पोचवाव्यात.’’
(प्रतिनिधी)
सुटाबुटातील सरकार असल्याबाबत आमच्या पंतप्रधानांवर टीका केली जाते, मात्र आमचे सरकार सूझ बुझ असलेले आहे. त्यांचे सरकार लूट तूट असलेले होते, असे सांगत नायडू म्हणाले देशवासीयांसाठी अच्छे दिन आले, कॉंग्रेससाठी मात्र बुरे दिन आले आहेत. चारशेवरुन त्यांच्या खासदारांची संख्या चाळीसवर आली, त्याचे कारण भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार हेच आहे. गेल्या वर्षभरात आमच्या सरकारमध्ये एकही राजकीय भ्रष्टाचार झालेला नाही. शिरोळे, कांबळे यांचीही भाषणे झाली. बापट यांनी कार्यकर्ते सरकारच्या योजनाचा प्रचार व अंमलबजावणी करीत नसल्याबदद्ल खेद व्यक्त करून तसे आवाहन केले.