आॅप्शन फॉर्म भरा गुरुवारपासून
By Admin | Updated: June 17, 2014 02:14 IST2014-06-17T02:14:08+5:302014-06-17T02:14:08+5:30
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा येत्या गुरुवारपासून (दि.१९) सुरू होणार आहे

आॅप्शन फॉर्म भरा गुरुवारपासून
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा येत्या गुरुवारपासून (दि.१९) सुरू होणार आहे. दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनंतर कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करण्यासाठी विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म) भरू शकतात. आॅनलाईन अर्जात भरलेल्या पसंतीक्रमानुसाराच विद्यार्थ्यांचे
प्रवेश निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता बिनचूकपणे अर्ज भरावा,
असे आवाहन शिक्षण
उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय प्रवेशपद्धतीने केले जात होते. परंतु, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने २0१४-१५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर शहरातील शाळांमार्फत अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतली गेली, तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे या संदर्भातील आॅप्शन फॉर्म संबंधित शाळांमधून भरून घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्वत:हून आॅप्शन फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे म्हणाल्या ,दहावीची परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांतच अकरावी आॅनालाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांना माहितिपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली.
तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावीच्या ६७ हजार ६६५ जागांवर विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जाणार असून आत्तापर्यंत ६२ हजार ३९२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरला आहे.(प्रतिनिधी)