पुण्यातही आता प्लॅस्टिकची अंडी?
By Admin | Updated: April 13, 2017 04:04 IST2017-04-13T04:04:05+5:302017-04-13T04:04:05+5:30
कोलकाता, चेन्नई आणि डोंबिवलीपाठोपाठ पुणे शहरातील कोथरूड भागातून प्लॅस्टिकच्या अंड्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए)

पुण्यातही आता प्लॅस्टिकची अंडी?
पुणे : कोलकाता, चेन्नई आणि डोंबिवलीपाठोपाठ पुणे शहरातील कोथरूड भागातून प्लॅस्टिकच्या अंड्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) प्राप्त झाली. त्यामुळे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विक्रेत्याकडून तपासणीसाठी अंडी ताब्यात घेतली आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच ही अंडी खरी की खोटी आहेत, हे स्पष्ट होईल.
देशात काही ठिकाणी प्लॅस्टिकची अंडी सापडत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यातूनच एका महिलेने एफडीए कार्यालयात कोथरूड परिसरातील प्लॅस्टिकची अंडी विकली जात असल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी दूरध्वनीद्वारे केली. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानातून अंड्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. तसेच, संबंधित विक्रेत्याने ज्या घाऊक विक्रेत्याकडून अंडी घेतली, त्याच्याकडूनही अंड्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले. (प्रतिनिधी)
प्रयोगशाळेत तपासणी करणार
एफडीएचे सहायक आयुक्त संजय शिंदे म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरातूनही प्लॅस्टिकच्या अंड्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. संबंधित दुकानातील अडी तपासली असता ती खरी असल्याचे अढळून आले. कोथरूड परिसरातील अंडी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली असून, त्या संदर्भातील अहवाल येत्या १० ते १२ दिवसांत प्राप्त होईल. त्यानंतरच ही अंडी खरी की खोटी, हे स्पष्ट होईल.’’