आमच्या पाण्याचे नियोजन करा
By Admin | Updated: August 21, 2015 02:34 IST2015-08-21T02:34:39+5:302015-08-21T02:34:39+5:30
गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी महापालिकेस

आमच्या पाण्याचे नियोजन करा
पुणे : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी महापालिकेस साधी पाणी नियोजनाची मागणीही करण्यात आलेली नाही. तर पालकमंत्र्यांनाही या स्थितीचे गांभीर्य नाही. त्यामुळे आता जलसंपदा खाते झोपले असले, तरी महापालिकेनेच पाण्याचे नियोजन सुरू करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत केली.
मुख्य सभा सुरू होताच विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी शहराच्या पाण्याची स्थिती गंभीर असून, धरणांमध्ये अवघे ५० टक्के पाणी आहे. त्यामुळे महापालिकेचे नियोजन काय आहे, पाटबंधारे विभागाकडून पालिकेस किती पाणी दिले जाणार, पुणेकरांना कपातीची कल्पना देण्यासाठी काय नियोजन केले, याचा खुलासा करण्याची मागणी केली. या वेळी मनसेने पाण्यावर चर्चा करू नये अशी मागणी केली. पाण्यावर चर्चेसाठी खास सभा बोलविण्याची मागणी मनसेने केली असून, या सभेत ही चर्चा केली जावी अशी मागणी मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी केली. तसेच ही चर्चा थांबविण्यासाठी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने या तहकुबीच्या विरोधात मतदान करून सूचना फेटाळून लावली. त्यानंतर पुन्हा पाण्यावरील चर्चेस सुरुवात करण्यात आली. या वेळी नगरसेवकांनी महापालिकेनेच नियोजन करावे अशी मागणी केली.
ही पाण्याची स्थिती म्हणजे भविष्यातील पाणीटंचाईचे सावट असून महापालिकेने इतर पर्यायी स्रोतांची माहिती घेऊन त्याचा वापर सुरू करावा अशी मागणी उपमहापौर आबा बागूल यांनी केली. समान पाणीवाटप आणि गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक किशोर शिंदे, सचिन भगत, बाबूराव चांदेरे, सभागृह नेते बंडू केमसे यांनी केली.
महापालिका तसेच जलसंपदा विभागाकडून दरवर्षी पाण्याचे एका वर्षासाठी नियोजन केले जाते. मात्र, पावसाची अनिश्चितता पाहता, यापुढे दोन वर्षांचे नियोजन केले जावे, अशी मागणी रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली. तसेच या पुढे महापालिकेने पाण्याची श्वेतपत्रिका काढावी असेही ते म्हणाले. शहरातील पाणीपुरवठा असमान असून, मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते. तसेच पाणी बांधकामासाठी वापरले जाते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, जलतरण तलाव बंद करावेत, टँकरची पाणीचोरी थांबवावी, अशी मागणीही धेंडे यांनी या वेळी केली.
(प्रतिनिधी)