खड्डा ठरतोय जीवघेणा
By Admin | Updated: May 28, 2014 00:30 IST2014-05-28T00:30:45+5:302014-05-28T00:30:45+5:30
पंचाळे बुद्रुक (ता. आंबेगाव) या गावाजवळील रस्त्यावर मधोमध पडलेला खड्डा या रस्त्यावरून वाहतूक करणार्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे

खड्डा ठरतोय जीवघेणा
डिंभे : पंचाळे बुद्रुक (ता. आंबेगाव) या गावाजवळील रस्त्यावर मधोमध पडलेला खड्डा या रस्त्यावरून वाहतूक करणार्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. जवळपास वर्षभरापासून हा खड्डा आहे त्या स्थितीत असून, या खड्ड्यामुळे येथे लहान-मोठे अपघात झाले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अडिवरेकडे जाणा-या रस्त्यावर पंचाळे बुद्रुक हे गाव लागते. या गावाला वळसा देताच पहिल्याच वळणावर रस्त्याच्या मधोमध एक भलामोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा जवळपास वर्षभरापासून पडला असूनही पावसाळ्यानंतर रस्त्याची डागडुजी करणा-या बांधकाम विभागाच्या पथकास दिसला कसा नाही? आणि दिसला असेल तर तो यापुर्वीच भरून का घेतला गेला नाही? हाच प्रश्न या रस्त्यावरून येणा-या जाणा-या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत आहे. अडिवरे ही या भागातील आठवड्याची बाजारपेठ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रही याच गावात असल्याने या रस्त्यावर ब-यापैकी वाहनांची ये-जा असते. रात्रीच्या वेळी तर हा खड्डाच दिसत नसल्याने दुचाकी घसरून पडल्याने अपघातही घडले आहेत. हा खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)