पिंपरी उड्डाणपुलाचा कठडा कोसळला
By Admin | Updated: June 30, 2015 23:25 IST2015-06-30T23:25:31+5:302015-06-30T23:25:31+5:30
वीस वर्षांपूर्वीचा शहरातील पहिला उड्डाणपूल इंदिरा गांधी उड्डाणपूल म्हणून ओळखला जातो. या पुलाचा रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कठडा तुटला.

पिंपरी उड्डाणपुलाचा कठडा कोसळला
पिंपरी : वीस वर्षांपूर्वीचा शहरातील पहिला उड्डाणपूल इंदिरा गांधी उड्डाणपूल म्हणून ओळखला जातो. या पुलाचा रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कठडा तुटला. सकाळी पुलाच्या खालील बाजूस वर्दळ कमी असल्याने कोणी जखमी झाले नाही. अत्यंत वर्दळीच्या या पुलावर दोन दिवसांपूर्वी दुर्घटना घडली. तातडीने दखल घेऊन दुरुस्ती होणे अपेक्षित असताना, प्रशासन मात्र दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू केले आहे.
वाहतूक पोलीस सकाळी ९नंतर पुलावर थांबतात. वाहतूक पोलीस येण्यापूर्वीच एका वाहनाने ठोकर दिल्याने पिंपरीकडे जाण्याच्या मार्गावर डावीकडील कठडा तुटला. सिमेंट, विटांचे तुकडे खाली पडले. पुलाखाली बसणारे भाजीविक्रेते येण्यापूर्वी ही घटना घडली असल्याने कोणाला इजा झाली नाही. पुलाच्या कठड्याचे खाली पडलेले तुकडे, राडारोडा उचलण्याची घाई करण्यात आली. कठडा तुटला, त्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली. त्याबद्दल मात्र कोणी दखल घेतलेली नाही.
या पुलावरून चिंचवड लिंक रस्ता येथे, तसेच काळेवाडी, पिंपरी, कॅम्प, पिंपरी गावाकडे जाण्यास मार्ग आहे. त्यामुळे नेहमीच या पुलावर वाहनांची मोठी वर्दळ असते. हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या पुलावर निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती बदलण्यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही दखल घेतली नाही. तुटलेला कठडा, तसेच अन्य ठिकाणी कमकुवत झालेला पूल मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, १९८४मध्ये बांधलेल्या या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतल्यास नेमक्या सुधारणा काय करायच्या, हे निश्चित होऊ शकेल, असे नागरिकांचे मत आहे. (प्रतिनिधी)