पिंपरी : रावेत येथील शेळके वस्तीत राहणाऱ्या ३५ कुटुंबांकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. महापालिका दरवर्षी न चुकता मालमत्ता कर घेते. पण, आमच्या वसाहतींमधील रस्त्यांवर खड्डे, चिखल झालेला दिसत नाही. यामुळे स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आम्हाला रस्ता, पाणी, पथदिवे, कचरा गाडीची सोय कधी देणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महापालिका हद्दीत रावेत येथे सर्व्हे.नं. ४३/२अ/ १/३ शेळके वस्ती आहे. साधारणपणे १९९० पासून अनेक कुटुंबांनी एक-दोन गुंठे जागा विकत घेऊन शेळके वस्ती, रावेत भागात राहात आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून तब्बल ३५ कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. रावेत ग्रामपंचायत असतानाही त्या जागेवर काही कुटुंबे वास्तव्य करत होती. सद्य:स्थितीत गेल्या ३५ वर्षात दोनशे ते अडीचशे नागरिक, महिला, लहान मुले, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी राहत आहेत.शेळके वस्ती, रावेत परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रस्ता, पाणी, ड्रेनेज व्यवस्था, कचऱ्याची घंटागाडी, पथदिव्यांची सोय करून मिळावी, अन्यथा महापालिकेच्या गेटसमोर वेळप्रसंगी कुटुंबांसह आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा तेथील नागरिक शेखर खंडागळे, कैलास जगताप, दीपक जगताप, बाळासाहेब जाधव, संजय बेलापुरे, स्मिता थोरात यांनी दिला आहे.
आम्ही ३० वर्षांपासून शेळके वस्तीत राहत आहे. महापालिका आमच्याकडून मालमत्ता कर घेते, आम्ही तो वेळेवर भरतो. परंतु, आम्हाला रस्ता, पाणी, पथदिवे देत नाही. कचऱ्याची गाडी पण पाठवत नाही. त्यामुळे आम्ही ग्रामीण भागात राहतो की महानगरपालिकेत हेच कळत नाही. मी स्वत: अपंग असताना घरी येताना चांगला रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढत यावे लागत आहे. -स्मिता जाधव, महिला
मागील महिनाभरात मुसळधार झालेल्या पावसामुळे आमच्या परिसरात चिखल झाला आहे. चांगला रस्ता नसल्याने घरी येताना चिखलातून यावे लागते. मात्र, घसरून पडल्यामुळे माझा खुब्यातून पाय मोडला आहे. गेले पंधरा दिवस झाले मी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे आम्हाला तत्काळ रस्ता करून द्यावा- कैलास जगताप, स्थानिक नागरिक
संबंधित परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांबाबत निवेदन महापालिकेकडे आले आहे. संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका