पिंपरी-चिंचवडला वाटाण्याच्या अक्षता
By Admin | Updated: May 25, 2016 04:45 IST2016-05-25T04:45:57+5:302016-05-25T04:45:57+5:30
स्मार्ट सिटीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश होण्यासाठी शहरातील राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न केले. भाजपाने पुढील यादीत उद्योगन

पिंपरी-चिंचवडला वाटाण्याच्या अक्षता
पिंपरी : स्मार्ट सिटीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश होण्यासाठी शहरातील राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न केले. भाजपाने पुढील यादीत उद्योगनगरीचे नाव असेल, असा दावाही केला. मात्र, स्मार्ट सिटीत पुन्हा शहरवासीयांना वाटाण्याचा अक्षता मिळाल्या आहेत. घोर निराशा झाली आहे.
गुणवत्ता असताना स्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या दहा शहरांच्या यादीतून पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला वगळण्यात आले. शहरावर अन्याय झाल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
स्मार्ट सिटीतून वगळल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, शहराचे महापौर शकुंतला धराडे यांनी नगरविकासमंत्र्यांची भेट घेऊन आमच्या शहरावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी केली होती. तसेच आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांनीही मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते.
त्यावेळी आपल्या मागणीचा विचार करू असे आश्वासन नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी दिले होते.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही पिंपरीकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहोचविल्या होत्या. तसेच, स्मार्ट सिटीत डावलेले असले, तरी पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज देऊ, असे जाहीर केले होते. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेतून अनेकांनी माघार घेतल्याने त्याऐवजी पिंपरी-चिंचवडचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा डावलल्याने शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. श्रेयवादाचे राजकारण थांबवा, अशीही मागणी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)
नागरिकांमधून नाराजी
शहराला पुन्हा एकदा स्मार्ट सिटीतून डावलण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
भाजपाला अजूनही स्मार्ट सहभागाची आशा
राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्या वतीने केंद्रात व राज्यात याबाबत प्रयत्न केले. मात्र, दुसऱ्या यादीतील तेरा शहरांतही समावेश न झाला नाही. पिंपरीकरांची राष्ट्रवादीची सत्ता असणाऱ्या महापालिकेला डावलण्यात भाजपाची खेळी असल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. स्मार्ट सिटी सहभागाची आशा अजूनही ्भाजपाला आहे.
पिंपरीकरांवर अन्याय
दुसऱ्या तेरा शहरांच्या यादीतही पिंपरीचा समावेश नाही. लखनौ, भागलपूर, न्यू टाऊन कोलकता, फरिदाबाद, चंडीगड, रायपूर, रांची, इम्फाळ, पोर्ट ब्लेअर, पणजी अशा तेरा शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश नाही. राष्ट्रवादीची सत्ता असल्यानेच स्मार्ट सिटीत डावलले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली असून, स्मार्ट सिटीत समावेश होईल, अशी अपेक्षा भाजपाला आहे.
स्मार्ट सिटी समावेशासाठी आम्ही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यासमवेत नगरविकासमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा केला. आपला स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, ही अपेक्षा आहे. पुन्हा सर्वांच्या मदतीने आपण स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करू.
- शकुंतला धराडे (महापौर)
एखादे शहर वगळले, तर पिंपरीचा समावेश करू, असे आश्वासन नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी दिले होते. मात्र, दुसऱ्या यादीतही आपले शहर नाही. यावरून स्मार्ट सिटी समावेशात राजकारण होत आहे, हे सरळसरळपणे दिसते. हा राष्ट्रवादीचा अपमान नसून, या शहरातील नागरिकांचा अपमान आहे.
-संजोग वाघेरे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
स्मार्ट सिटीत घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी घेतले होते. मात्र, दुसऱ्या यादीतही आपले शहर नाही. विकासात कोणतेही राजकारण होऊ नये, सत्ताधारी बोलतात एक, करतात एक. हे धोरण चुकीचे आहे. गुणवत्तेनुसार स्मार्ट सिटीत समावेश व्हावा. तो आपला हक्क आहे, मिळायलाच हवा.
-राहुल भोसले (विरोधी पक्षनेते)
स्मार्ट सिटीतून वगळल्यानंतर आम्ही प्रयत्न करू, अशी वल्गना करणाऱ्यांची आश्वासने ही पोकळच आहेत, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. स्मार्ट सिटी समावेशासाठी सत्ताधाऱ्यांना काहीही करता आले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. हा शहराचा अपमान आहे. अशा लोकांना जनता जागा दाखवून देईल.
- सचिन साठे (शहराध्यक्ष, काँग्रेस)
गुणवत्ता असतानाही आपल्या शहराला डावलले जात आहे. यात राजकारण होत आहे, ही बाब उघड आहे. या संदर्भात शहरवासियांसह शिवसेनेनेही पाठपुरावा केला होता. पुढील यादीत समावेश करू, असे आश्वासनही मिळाले. मात्र, दुसऱ्या यादीत नाव नाही, ही बाब शहरावर अन्याय करणारी आहे.
- सुलभा उबाळे (गटनेत्या, शिवसेना)
स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडचा शहराचा समावेश झाला नाही. याबाबत भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. यापुढील नवीन शहराच्या यादीत आपल्या शहराचा समावेश होईल, अशी आशा आहे. यासाठी स्थानिक खासदार, आमदार प्रयत्न करतील. त्यामुळे स्मार्ट सहभागाबद्दल आम्ही आशादायी आहोत.-वर्षा मडिगेरी (गटनेत्या, भाजपा)